अखिल भारतीय कॅरम महासंघाचे सरचिटणीस प्रभजीत सिंग बछेर यांनी घरच्या मैदानावर आयोजित केलेली कॅरम स्पर्धा वादाने गाजली. दिल्ली संघाला नियमांवर बोट ठेवून प्रवेश नाकारल्याने हा वाद चिघळला. आज येथील वसंत देसाई सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर दिल्ली संघाचे पदाधिकारी, खेळाडू यांनी उद्घाटक आमदार गोपीकिसन बाजोरीया, आमदार वसंतराव खोटरे यांना घेराव घातला. त्यांनी या स्पर्धेच्या आयोजकांबद्दल तक्रार केली. दिल्ली संघाच्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघाने खुलेआम पाठिंबा देत आयोजकांना कात्रीत पकडले.
अकोल्यात ४२व्या वरिष्ठ राष्ट्रीय तथा आंतरराज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन क्रांतिवीर नागनाथअन्ना नायकवाडी चषक या नावाने करण्यात येत आहे. या स्पर्धेतील अनागोंदीचे सविस्तर वृत्त गेल्या काही दिवसांपासून लोकसत्ताने प्रकाशित केले. या वृत्ताचे पडसाद स्पर्धेच्या उद्घाटन स्थळी पडल्याचे चित्र होते. नियमांवर बोट ठेवताना कॅरम स्पर्धकांवर अन्याय होऊ नये, अशी तीव्र भावना यावेळी राष्ट्रीय खेळाडू कविता सोमांशी यांचे वडील उमाशंकर सोमांशी यांनी येथे व्यक्त केली. अशाच प्रकारची भावना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांनी व्यक्त केली. त्यांनी फेडरेशनच्या वादात खेळाडूंचे नुकसान टाळण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेवर बहिष्कार आम्ही टाकला नाही, पण आम्ही दिल्ली संघासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली संघाला चंदीगढ, गोवा, तामिळनाडू यांनीदेखील पाठिंबा दिला.
या संबंधी वादाचे एकमेव कारण या स्पधेच्या प्रवेशाची अट ठरली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सब ज्युनिअर व ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत भाग घेतलेला असावा अशी अट टाकण्यात आली. यापैकी सब ज्युनिअर स्पर्धेत दिल्लीचा संघ तांत्रिक कारणाने सहभागी झाला नाही. त्यामुळे त्याचा प्रवेश आयोजकांनी नाकारला, तर नियमातील दुसरी अट, ज्युनिअर नॅशनल स्पर्धा खेळलेला असावा. ती पूर्ण होणे शक्य नव्हते. ही स्पर्धा यंदा मार्चमध्ये असल्याने या अटीवर दिल्ली कॅरम असोसिएशनचे महासचिव व्ही.डी.नारायण यांनी आक्षेप घेतला. स्पर्धेच्या नियमात महासंघाच्या निर्णयाविरोधात कुणाला कोर्टात किंवा इतर ठिकाणी दाद मागता येणार नाही, ही अफलातून अट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिल्ली संघाला या स्पर्धेत सहभागी करून घेण्याची मागणी केली. पण, कॅरम महासंघाचे सचिव बछेर यांनी दिल्ली संघाकडून नाही तर महासंघाचे खेळाडूना खेळण्यास मुभा दिली. या वादाने स्पर्धेच्या उद्घाटनानंतर जोरदार वाद झाला. दिल्ली संघाने स्पर्धेचे उद्घाटक आमदार गोपीकिशन बाजोरीया व आमदार वसंत खोटरे यांना घेराव घालत स्थानिक आयोजकांबद्दल नाराजी व्यक्त केली. आयोजकांनी नियमांवर बोट ठेवत त्यांची बाजू योग्य असल्याचे स्पष्ट केले.
आज सकाळी येथील वसंत देसाई सभागृहात या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोपीकिशन बाजोरीयांनी या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाने अकोल्याचा गौरव वाढल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्रात सरकारने क्रांतिकारक पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. उद्घाटन समारंभास जिल्हा परिषद अध्यक्षा, महापौर, उपमहापौर यांची हजेरी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप फुंडकर, संचालन धैर्यवर्धन फुंडकर यांनी तर आभार प्रभजीत सिंग बछेर यांनी मानले.   
वर्चस्वाचा वाद
संघटनेतील वर्चस्वाच्या मुद्यावरून हा वाद वाढला आहे. कॅरम महासंघाचे महासचिव एस.के.शर्मा यांच्यामुळे यात भर पडत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. एस.के.शर्मा यांनी संघटनेवर पकड घट्ट करण्यासाठी महासंघाचे नवनिर्वाचित सरचिटणीस प्रभजीत सिंग बछेर यांचा वापर सुरू केला. बछेर यांनी शर्मा गोटातून बाहेर यावे व कॅरमला प्राधान्य द्यावे, अशी काहींची मागणी आहे. तसेच कॅरम महासंघाच्या निवडणुकीत अकोल्याचे (महाराष्ट्रातील) बछेर यांची निवड दिल्ली स्थित संघटनेच्या पचनी पडली नाही. बछेर यांना महाराष्ट्रातून अंतर्गत विरोध असला तरी देशातील इतर संघाचा जोरदार पाठिंबा आहे. महासंघाच्या निवडणुकीत बछेर यांनी पराभव केलेल्या व्ही.डी.नारायण यांनी या निवडणुकीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महासंघाच्या निवडणुकीतील वादामुळे कॅरम स्पर्धा आणि खेळाडू यांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे.