न्यूयॉर्क : फ्रेंच विजेती बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि द्वितीय मानांकित आर्यना सबालेंका यांनी सोमवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. पुरुषांमध्ये डॅनिल मेदवेदेव, फेलिक्स अलिसीमे यांनी दमदार विजयांची नोंद केली.

महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या आठव्या मानांकित क्रेजिकोव्हाने स्पेनच्या नवव्या मानांकित गर्बिन मुगुरुझाला ६-३, ७-६ (७-४) असे पराभूत केले. बेलारूसच्या सबालेंकाने १५व्या मानांकित एलिस मर्टेन्सला ६-४, ६-१ अशी धूळ चारली. उपांत्यपूर्व फेरीत क्रेजिकोव्हा आणि सबालेंका आमनेसामने येतील. युक्रेनच्या पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाने सिमोना हॅलेपवर ६-३, ६-३ अशी मात केली.

पुरुष एकेरीत रशियाच्या दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने डॅन इव्हान्सवर ६-३, ६-४, ६-३ असे वर्चस्व गाजवले. कॅनडाच्या १२व्या मानांकित फेलिक्सने अमेरिकेच्या फ्रान्सेस टिआफोवर ४-६, ६-२, ७-६ (८-६), ६-४ अशी सरशी साधली. बोटिक व्हॅन डी झँडशूल्पने १०व्या मानांकित दिएगो श्वार्टझमनवर ६-३, ६-४, ५-७, ५-७, ६-१ असा संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवला.

क्रेजिकोव्हाचा वेळकाढूपणा

क्रेजिकोव्हाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर मुगुरुझाने तिच्या वेळकाढू वृत्तीवर टीका केली आहे. दुसऱ्या सेटमध्ये मुगुरुझा ६-५ अशी आघाडीवर असताना क्रेजिकोव्हाने जाणूनबुजून वैद्यकीय उपचारासाठी विश्रांती घेतल्याचा आरोप तिने केला आहे. क्रेजिकोव्हाने मात्र हा आरोप फेटाळून लावताना त्यावेळी खरोखरच श्वास घेताना अडचणी जाणवल्यामुळे आपण विश्रांती घेतली आणि सामन्यानंतर पत्रकार परिषदेला जाणेही टाळले, असे स्पष्टीकरण दिले.