जयपूर येथे आयोजित राष्ट्रीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय मानांकित नाशिकची वैदेही चौधरी अजिंक्य ठरली. या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारी वैदेही ही नाशिकची पहिलीच स्पर्धक आहे.
वैदेहीने अंतिम सामन्यात चतुर्थ मानांकित आंध्र प्रदेशच्या एम. तनिष्कवर २१-१३, २१-१७ अशी मात केली. त्याआधी उपांत्य फेरीत प्रथम मानांकित आसामच्या अस्मिता छलियाचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला. वैदेहीने याआधी १३, १५, १७ वयोगटांत राज्य अजिंक्यपद मिळविले आहे. येथील बीवायके महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली वैदेहीने पाच वर्षे मकरंद देव यांच्याकडे, तर दीड वर्षांपासून ती नागपूर येथे जे. बी. वर्गीस यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.