मुलतान सुलतान्सचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. पीएसएलचे राहिलेले सामने अबुधाबीला खेळवण्यात येणार आहेत, या सामन्यांसाठी आफ्रिदी कराची येथे सराव करत होता. सरावादरम्यान त्याला दुखापत झाली. यानंतर एका डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि विश्रांतीचा सल्ला दिला.

हेही वाचा – पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपल्या ‘प्रमुख’ गोलंदाजाला काढलं PSL स्पर्धेबाहेर, वाचा कारण

आफ्रिदीने सोशल मीडियावर झालेल्या दुखापतीविषयी माहिती दिली. तो म्हणाला, ”सराव करताना मला माझ्या कमरेखाली दुखापत जाणवली. डॉक्टरांनी दुर्दैवाने मला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि यामुळे आता मी माझ्या संघ मुलतान सुलतान्सबरोबर जाऊ शकत नाही. यामुळे माझे हृदय तुटले आहे, कारण मी सराव करीत होतो आणि प्रशिक्षण चांगले चालू होते.”

 

 

आता मुलतान संघात शाहिद आफ्रिदीची जागा खैबर पख्तूनख्वाचा डावखुरा फिरकीपटू असिफ आफ्रिदीने घेतली आहे. करोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) २० फेब्रुवारीपासून सुरू झालेली पीएसएल स्पर्धा ४ मार्चला स्थगित केली. त्यानंतर पीसीबी आणि सहा पीएसएल फ्रेंचायझीजची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. आता या टी-२० स्पर्धेतील उर्वरित २० सामने जूनमध्ये अबुधाबी येथे घेण्याचे ठरले. पीसीबी लवकरच तारखांची घोषणा करेल.

जावयाने केली प्रार्थना

शाहिद आफ्रिदीच्या दुखापतीनंतर त्याचा जावई आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने त्याच्यासाठी प्रार्थना केली. ”लाला लवकर ठीक व्हा. तुम्ही पाकिस्तानचा अभिमान आहात. पीएसएलमध्ये तुमची उणीव जाणवेल”, असे शाहीनने ट्वीट करून म्हटले आहे.

 

शाहिन हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार शाहिदची मोठी मुलगी अक्सा शाहिनशी लग्न करणार आहे. या लग्नाच्या चर्चा यावर्षी मार्चपासून येऊ लागल्या होत्या.