कैरो :  इजिप्तचा गोलरक्षक एसाम अल हादरी याने राष्ट्रीय संघातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. रशियामध्ये नुकत्याच झालेल्या फुटबॉल विश्वचषकात खेळलेला एसाम हा तब्बल ४५ वर्षांचा गोलरक्षक होता.

इजिप्तसाठी तब्बल २२ वर्ष ४ महिने आणि १२ दिवस इतक्या प्रदीर्घ काळासाठी खेळून त्याने ही निवृत्ती घेतली आहे. ‘‘देशासाठी विश्वचषक खेळल्यानंतर मला असे वाटले की निवृत्त होण्यासाठी हीच वेळ योग्य वाटल्याने मी निवृत्ती जाहीर करीत आहे’’ असे एसामने म्हटले आहे. इजिप्तमधील फॅरोह नावाच्या क्लबसाठी एसामने १९९६ साली पहिला सामना खेळला. त्यानंतर त्याने तब्बल १५९ सामने देशासाठी खेळले. अर्थात एसामने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून म्हणजेच राष्ट्रीय संघातून निवृत्त होण्याची घोषणा केली असली तरी तो त्याच्या इस्मायली या क्लबकडून मात्र खेळत राहत राहणार आहे. २००६ आणि २०१० साली झालेल्या आफ्रिकन चषकच्या विजेतेपदानंतर एसाम हा इजिप्तचा राष्ट्रीय नायक ठरला होता.