* प्रखर उष्णता आणि आद्र्रतेमुळे खेळाडूंचे माघारसत्र सुरूच * रॉजर फेडरर, अँडी मरेची आगेकूच
* जोहाना कोन्टाचा विक्रमी वेळेत विजय
सूर्य आग ओकत असतानाही जेतेपदासाठी रिंगणात असलेल्या रॉजर फेडरर, अँडी मरे यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच केली. पराभवासह ऑस्ट्रेलियाच्या ल्युटन हेविटने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला अलविदा केला. उष्ण वातावरणामुळे थकवा जाणवत असल्याने दोन खेळाडूंनी माघार पत्करली. स्पर्धेतून माघार घेतलेल्यांची संख्या १२ झाली आहे. महिलांमध्ये सिमोन हालेप, व्हिक्टोरिया अझारेन्का, पेट्रा क्विटोव्हा यांनीही विजयी वाटचाल केली. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिलांच्या विक्रमी कालावधीच्या लढतीत इंग्लंडच्या जोहाना कोन्टाने खळबळजनक विजय नोंदवला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या आणि द्वितीय मानांकित रॉजर फेडररने जेमतेम दीड तासातच बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसचा ६-१, ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला. या स्पर्धेची पाच जेतेपदे नावावर असलेल्या फेडररची पुढची लढत जर्मनीच्या २९व्या मानांकित फिलीप कोहलश्रायबरशी होणार आहे. तृतीय मानांकित आणि २०१२ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या अँडी मरेला तिसरी फेरी गाठण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. दोन सेटने पिछाडीवर पडलेल्या मरेने फ्रान्सच्या अॅड्रियन मानारिओवर ५-७, ४-६, ६-१, ६-३, ६-१ असा विजय मिळवला. तंदुरुस्ती आणि चिवटपणाची परीक्षा पाहणाऱ्या या लढतीनंतर तिसऱ्या फेरीत मरेसमोर ब्राझीलच्या थॉमझ बेल्युसीचे आव्हान असणार आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेचा विजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने रशियाच्या मायकेल युझनीचा ६-३, ६-४, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. बरनॉर्ड टॉमिकने स्वदेशीय अनुभवी ल्युटन हेविटला ६-३, ६-२, ३-६, ५-७, ७-५ असे नमवले. पुढील वर्षी घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर हेविट निवृत्त होणार आहे.
महिलांमध्ये इंग्लंडच्या जोहान कोन्टाने या स्पर्धेतील महिलांच्या सर्वाधिक वेळ चाललेल्या लढतीत विजय साकारला. ३ तास आणि २३ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत २४ वर्षीय कोन्टाने गार्बिन म्युग्युरुझावर ७-६ (७-४), ६-७ (४-७), ६-२ असा विजय मिळवला. २०११ मध्ये समंथा स्टोसूर आणि नाडिया पेट्रोव्हा यांच्यातील लढत ३ तास आणि १६ मिनिटे चालली होती. द्वितीय मानांकित सिमोन हालेपने युक्रेनच्या केटरायना बाँडारेन्कोला ६-३, ६-४ असे नमवले. व्हिक्टोरिया अझारेन्काने यानिना विकमेयरचा ७-५, ६-४ असा पराभव केला. चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा सेटकोव्हस्काने चौथ्या मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीवर ६-४, ५-७, ७-६ असा विजय मिळवला. समंथा स्टोसूरने इव्हेन्जी रोडिनाचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला.
उष्णतेचा प्रकोप सुरूच
पाऱ्याने तिशी ओलांडल्याने टेनिसपटूंना वातावरणाशी जुळवून घेणे कठीण झाले. अमेरिकेच्या जॅक सॉकला बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्सविरुद्धच्या लढतीत थकव्याचा त्रास जाणवू लागला. थोडय़ा वेळाने खेळताना तो कोर्टवर कोसळला. त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र उष्णतेचा प्रकोप सहन होत नसल्याने सॉकने माघार घेण्याचा निर्णय घेतला. उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनलाही असाच त्रास जाणवला आणि त्यानेही माघार घेतली.
खेळण्यावाचून पर्याय नाही-फेडरर
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यान हवामान खुपच प्रतिकूल आहे. मात्र या वातावरणाशी आपल्याला जुळवून घ्यावे लागेल. या परिस्थितीत खेळण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही असे रॉजर फेडररने सांगितले. या स्पर्धेच्या तयारीसाठी सर्वच खेळाडू किमान पंधरा दिवस आधी दाखल झाले आहेत. वातावरण अत्यंत उष्ण आणि आद्र्रतापूर्ण आहे यात शंकाच नाही. मात्र या वातावरणातही खेळण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या सामन्यांमध्ये तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी तज्ञांची मदत घ्यायला हवी असे फेडररने सांगितले.
लिएण्डर, सानिया दुसऱ्या फेरीत
लिएण्डर पेस आणि सानिया मिर्झा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खेळताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. लिएण्डरने पुरुष दुहेरीत फर्नाडो व्हर्डास्कोच्या साथीने खेळताना फ्लोरिन मेयर आणि फ्रँक मोडर जोडीवर ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवला. पुढच्या फेरीत या जोडीची लढत स्टीव्ह जॉन्सन आणि सॅम क्वेरी जोडीशी होणार आहे.
महिला दुहेरीत अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने केटलन ख्रिस्तियन आणि सर्बिना सँटामारिया जोडीवर ६-१, ६-२ अशी मात केली. दुसऱ्या फेरीत या जोडीची लढत तिमेआ बासिनझस्की आणि चिआ जुंग चुआंग जोडीशी होणार आहे. सानिया मिश्र दुहेरीत ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसच्या साथीने खेळणार आहे. या जोडीची सलामीची लढत आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युकाझ क्युबोट जोडीशी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2015 रोजी प्रकाशित
सूर्याची ‘सव्र्हिस’ तीव्र..
उष्ण वातावरणामुळे थकवा जाणवत असल्याने दोन खेळाडूंनी माघार पत्करली.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 05-09-2015 at 00:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victims continue to drop due to heat at us tennis open