scorecardresearch

PSL 2023: शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीची दहशत; पहिल्याच चेंडूवर केल्या बॅटच्या चिंध्या, तर दुसऱ्या चेंडूवर…, पाहा VIDEO

Lahore Qalandar vs Peshawar Zalmi: पीएसएल २०२३ मधील १५ वा सामना लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यात झाला. या सामन्यात लाहोर कलंदरने ४० धावांनी विजय मिळवला.

Pakistan Super League 2023 Updates
शाहिन आफ्रिदी (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Pakistan Super League 2023: पीएसएल २०२३ च्या १५ व्या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने गोलंदाजीने कहर केला. शाहीन आफ्रिदीने ४ षटकात ४० धावा देत ४ बळी घेतले. शाहीनच्या धारदार गोलंदाजीसमोर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मी संघाच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. ज्यामुळे त्यांना लाहोर कलंदर्सकडून ४० धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्या दरम्यानचा शाहीनच्या शानदार गोलंदाजीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पेशावर झल्मीचा सलामीवीर मोहम्मद हारिसची बॅट तोडली. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट घेतली. हारिस खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. आफ्रिदीने बाबर आझमलाही टिकू दिले नाही. त्यालाही ७ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बोल्ड केले. खालील व्हिडिओमध्ये, तुम्ही शाहीन आफ्रिदी हारिसची बॅट तोडताना आणि पुढच्याच चेंडूवर विकेट घेताना पाहू शकता.

पाकिस्तान सुपर लीग २०२३ मधील पेशावर झल्मीचा ५ सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे. गुणतालिकेत तो खालून दुसऱ्या स्थानावर आहे. लाहोर कलंदर ४ पैकी ३ सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर २६ फेब्रुवारी २०२३ च्या रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात शाहीन आफ्रिदी पहिल्याच चेंडूपासून लयीत दिसला.

राशिद खानच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम –

शाहीनशिवाय लाहोर कलंदर्सच्या जमान खानने ३ षटकात २८ धावा देत २ बळी घेतले. हारिस रौफ आणि राशिद खान यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले. राशिद खानने मात्र या दरम्यान लाजिरवाणा विक्रम केला. राशिद खानने ४ षटकात ४९ धावा देत एक विकेट घेतली. पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाचा हा सर्वात महागडा स्पेल आहे. टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचे तर, संयुक्तपणे हा पाचवा सर्वात महागडा स्पेल होता. राशिद खानला हा विक्रम लक्षात ठेवायला नक्कीच आवडणार नाही.

हेही वाचा – NZ vs ENG 2nd Test: केन विल्यमसनने रॉस टेलरला मागे टाकत रचला इतिहास; शतक झळकावत न्यूझीलंडचा सावरला डाव

फखर जमानने ४५ चेंडूत १० षटकार लगावले –

लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यातील सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लाहोर कलंदरने २० षटकात ३ विकेट गमावत २४२ धावा केल्या. त्यांचा सलामीवीर फखर जमानने ४५ चेंडूत ३ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. अब्दुल्ला शफीकने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या.

हेही वाचा – NZ vs ENG 2nd Test: केन विल्यमसनने रॉस टेलरला मागे टाकत रचला इतिहास; शतक झळकावत न्यूझीलंडचा सावरला डाव

सॅम बिलिंग्सने २०० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या –

सॅम बिलिंग्सने २३ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पेशावर झाल्मीचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ २०१ धावाच करू शकला. त्यांच्याकडून सॅम अय्युबने ३४ चेंडूत ५१, टॉम कोहलर-कॅडमोरने २३ चेंडूत ५५, भानुका राजपक्षेने १४ चेंडूत २४, रोव्हमन पॉवेलने १५ चेंडूत २०, जेम्स नीशमने ८ चेंडूत १२ आणि साद मसूदने ८ चेंडूत १६ धावा केल्या. परंतु त्याचा संघ जिंकू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 14:19 IST