प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस लष्करी, निमलष्करी दलातील सैनिकांना तसेच संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३५९ अधिकाऱ्यांना विविध पदके जाहीर करण्यात आली. ऑलिंपिक स्पर्धामधील रौप्यपदक विजेता विजय कुमारला अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिंपिक स्पर्धेत पदकापासून वंचित राहणारा हवालदार लैशराम देवेंद्रो सिंग यालाही विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गुप्तचर खात्याचे २८ अधिकारी आणि दिल्ली पोलिसांतील २१ जणांचाही पदक जाहीर झालेल्या व्यक्तींच्या यादीत समावेश आहे. ले.जन. सुरेंद्र कुलकर्णी, मे.जन. संजय कुलकर्णी, रीअर अ‍ॅडमिरल राकेश पंडित, रीअर अ‍ॅडमिरल किशोर ठाकरे, रीअर अ‍ॅडमिरल अभय कर्वे, एअर कमोडोर राजेंद्र गायकवाड, ब्रि.शैलेश तिनईकर आणि कॅ. प्राची गोळे या मराठी अधिकाऱ्यांचा अति विशिष्ट सेवा पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे.