बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे मत
वादविवादांनंतर भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिला आणि कर्णधार विराट कोहलीवर सर्व बाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी मात्र कोहलीची बाजू घेतली आहे. कुंबळे प्रकरणात काहीही कारण नसताना कोहलीला लक्ष्य केले जात आहे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
‘माझ्या मते कोहलीला काहीही कारण नसताना लक्ष्य केले जात आहे. माझ्या मते हा विषय इथेच संपवायला हवा. पुढील दहा वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटला मोठय़ा उंचीवर नेण्यासाठी कोहलीकडे क्षमता आहे. क्रिकेटपटूला लक्ष्य केले जात असल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही आजी-माजी क्रिकेटपटूंना लक्ष्य केले गेले आहे,’ असे ठाकूर म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकूर यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. पण जेव्हा ठाकूर बीसीसीआयचे अध्यक्ष होते तेव्हाही ते कोहलीच्या पाठीशी होते.
‘जर पूर्वीची बीसीसीआय असती तर हा विवाद एवढा चिघळायला दिला नसता. क्रिकेट सल्लागार समितीच्या शिफारशींचा सन्मान केल्याबद्दल बीसीसीआयला श्रेय द्यायला हवे. पण जर बीसीसीआयने कुंबळे यांच्याशी एक वर्षांचा करार केला असेल तर त्यांच्याबद्दल निर्णय घेण्याचा बीसीसीआयला पूर्ण अधिकार आहे,’ असे ठाकूर यांनी सांगितले.
सध्याच्या वादविवादाचा विचार केला तर त्याबद्दल बीसीसीआयला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणार आहेत. याबाबत ते पुढे म्हणाले की, ‘या प्रकारच्या गोष्टी आम्ही कधीही बीसीसीआयच्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. जेव्हा कुंबळे यांना एका वर्षांसाठी करारबद्ध केले होते तेव्हा कुणीही आक्षेप घेतला नव्हता. जेव्हा मी बीसीसीआयमध्ये होते तेव्हाही कुणी काही बोलले नाही. त्या वेळी कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये वाद होता, याबद्दल कुणीही भाष्य केले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला जे बीसीसीआयमध्ये आहेत त्यांना प्रश्न विचारायला हवीत आणि या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ते बांधील असतील.’
भारतीय संघ पूर्णपणे व्यावसायिक – बांगर
अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यामुळे संघात पोकळी निर्माण झाली आहे. कोणत्याही संघातून एखादी महत्त्वाची व्यक्ती तडकाफडकी गेली तर त्याचा नक्कीच परिणाम होतो. पण भारतीय संघ पूर्णपणे व्यावसायिक आहे. प्रत्येक संघटनेमध्ये या प्रकारच्या गोष्टी घडत असतात, हे साऱ्यांनी स्वीकारायला हवे. सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी या प्रकरणानंतरही एकत्रितपणे कामगिरी केली आहे.