नवी दिल्ली : क्रिकेटमधील माझ्या प्रदीर्घ अपयशाचे खास असे कारण नाही. पण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता नसती, तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकलोच नसतो, असे मत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

गेल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही. ‘स्टार स्पोर्टस’च्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात कोहली म्हणाला, ‘‘या गोष्टींचा विचार करत बसणे मला पटत नाही. माझे तंत्र चुकत असल्याचीही चर्चा आहे. पण, असेही नाही. माझा खेळ कसा आहे आणि मी कसा खेळतोय, याची मला पूर्ण माहिती आहे. वेगवेगळय़ा गोलंदाजांचा सामना करण्याची आणि परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता माझ्यात होती म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे टिकू शकलो.’’

‘‘माझ्याकडे क्षमता होती, त्यानुसार मी त्यावर मात केली. आशिया चषकासाठी मी सज्ज झालो आहे. माझ्यासमोर सातत्य दाखवण्याचे आव्हान आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आजपर्यंतचा अनुभव कामी येईल,’’ असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.

या कालावधीने मला वेगळाच अनुभव दिला. मला काय करता येऊ शकते, हे शिकायला मिळाले. माझ्यासाठी हे सगळे सोपे होते. मला आणखी शिकायचे आहे. एक खेळाडू आणि माणूस म्हणून माझे महत्त्व काय आहे, ते मला समजून घ्यायचे आहे.   विराट कोहली