अंगठ्याच्या दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत कोहलीवर भारतीय संघाची ‘विराट’ जबाबदारी असणार आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱया अॅडलेड कसोटीमध्ये विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याची कोहलीची ही पहिलीच वेळ असणार आहे. पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्त्व करणार असल्याची माहिती खुद्द विराटनेच दिली असून हा क्षण अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्याने सांगितले.
तर, दुसऱयाबाजूला ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क दुखापतीपासून सावरला असल्यामुळे पहिल्या कसोटीत मायकेल ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सनने मायकेल पूर्णपणे फिट असून तोच संघाचे नेतृत्त्व करणार असल्याचे सांगितले. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उसळता चेंडू लागून मृत्यू झालेला फिल ह्यूजेस याला श्रद्धांजली म्हणून त्याचा संघात तेरावा खेळाडू समावेश केला असून सामन्याच्या सुरूवातीला ह्जुजेसला श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचीही माहिती जॉन्सनने दिली.