ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरूवातीला काहीशी डगमगली. पण तळाच्या दोन फलंदाजांनी दमदार खेळ करत संघावरील दबाव कमी केला. शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा (४४), चेतेश्वर पुजारा (२५), अजिंक्य रहाणे (३७), मयंक अग्रवाल (३८) आणि ऋषभ पंत (२३) हे फलंदाजही खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर बाद झाले. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली.

शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. ११५ चेंडूत त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावत अर्धशतक केले. तसेच सुंदरनेदेखील १४४ चेंडूत ६२ धावा केल्या. भारताचा कर्णधार विराटने त्याच्या आणि सुंदरच्या खेळीची स्तुती केली. विशेष म्हणजे त्याने शार्दुलचं मराठीत कौतुक केलं. “वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर, तुम्ही दोघांनी अतिशय मोक्याच्या वेळी तुमची उपयुक्तता सिद्ध केलीत. स्वत:च्या खेळीवर विश्वास ठेवत तुम्ही सामना भारतासाठी पुन्हा जिवंत केलात. हीच कसोटी क्रिकेटची खरी मजा आहे. वॉशिंग्टन तू पदार्पणाच्या सामन्यात दमदार कमाल केलीस आणि तुला परत मानला रे ठाकूर!”, अशा शब्दात त्याने दोघांचं कौतुक केलं.

दरम्यान, या दोघांच्या खेळीच्या जोरावर एकेकाळी ६ बाद १८६ अशी अवस्था असणाऱ्या भारतीय संघाने ३३६ धावांपर्यंत मजल मारली. सुंदर-शार्दुल या दोघांनी १२३ धावांची भागीदारी रचली. अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या नवख्या जोडीने शांत आणि संयमी फलंदाजी केली. दोघांनीही आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या विकेटसाठी ही भारताची सर्वात मोठी भागीदारी ठरली.