आक्रमकतेचे दुसरे नाव असलेला.. गोलंदाजांवर दहशत निर्माण करणारा.. सहजपणे चेंडू सीमापार करण्यावर हुकूमत असलेला तडफदार सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अखेर १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचे सेहवागने स्पष्ट केले आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावले होते, त्याबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसरे द्विशतक झळकावण्याचा मानही सेहवागला मिळाला होता. सेहवागच्या निवृत्तीने मैदानातील तोफ थंडावली, अशी प्रतिक्रीया क्रिकेट रसिक आणि जाणकारांकडून येत आहेत.
सोमवारी दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सेहवागने याबाबत अप्रत्यक्षपणे सूचना दिली होती. पण ही घोषणा करण्यासाठी त्याने ३७वा वाढदिवस निवडला.

‘‘जे मला योग्य वाटले तेच मी नेहमी करत आलो आहे आणि आज घेतलेला निर्णयही योग्य आहे. देवाच्या कृपेमुळेच मला जे मैदानात आणि मैदानाबाहेर काही करावेसे वाटले ते करता आले. ३७व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे मला वाटले आणि तेच मी करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून आणि आयपीएलमधून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढील वेळ कुटुंबीयांसमवेत व्यतीत करण्याचा माझा मानस आहे,’’ असे सेहवागने पत्रकात म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला की, ‘‘या प्रवासासाठी मी बरेच वर्षे माझ्यासह खेळलेल्या सहकाऱ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, या प्रवासामध्ये मला काही महान खेळाडूंचाही सहवास लाभला, त्यांचेही आभार. ज्यांच्या नेतृत्वाखाली मी खेळलो त्यांचेही आभार. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि कायम माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्याचबरोबर माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या चाहत्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो.’’

all the three parties in grand alliance fighting to take the lok sabha seat of nashik
भुजबळांचे विधान अन नाशिकमध्ये उमेदवारांच्या स्पर्धेत वाढ
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
vanchit bahujan aghadi marathi news, prakash ambedkar marathi news
ॲड. प्रकाश आंबेडकरांकडे एकही वाहन नाही, कर्ज नाही; जंगम व स्थावर मालमत्तेत मात्र…

१४ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सेहवागने १०४ कसोटी सामन्यांमध्ये ४९.४२ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या, यामध्ये २३ शतकांसहित ३२ अर्धशतकांचा सहभाग होता. पाकिस्तानविरोधात त्रिशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला होता. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना मुलतानमधील सामन्यात त्याने ३१९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला ‘मुलतान के सुलतान’ अशी उपाधीही चाहत्यांनी दिली होती.
२५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये सेहवागने ८२७३ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये १५ शतकांसह ३८ अर्धशतकांचा सहभाग होता. भारताच्या दोन विश्वविजयांमध्ये सेहवागचा सहभाग होता.

निवृत्तीमागचे कारण ?
मार्च २०१३ नंतर सेहवाग एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. आता त्याच्यापुढे मास्टर्स चॅम्पियन्स लीग २०२० या स्पर्धेचा पर्याय उपलब्ध होता. या स्पर्धेमध्ये फक्त निवृत्त खेळाडूच खेळू शकतात, असा नियम असल्याने सेहवागने निवृत्ती घेतली असे म्हटले जात आहे. या लीगच्या उद्घाटन सोहळ्याला सेहवाग उपस्थित होता, तेव्हाच साऱ्यांना सेहवागच्या निवृत्तीची पूर्वकल्पना आली होती, त्यावर सेहवागने मंगळवारी शिक्कामोर्तब केले.

क्रिकेट हे माझे आयुष्य होते आणि यापुढेही राहील. भारतासाठी खेळणे हा एक अविस्मरणीय असा प्रवास होता आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी आणि चाहत्यांसाठी हा प्रवास अद्भुत व्हावा, यासाठी मी प्रयत्न केले. या प्रयत्नांमध्ये मी यशस्वी ठरलो आहे, असे मला वाटते.

व्हिव्ह रिचर्ड्स यांना प्रत्यक्ष फलंदाजी करता पाहता आले नाही. मात्र, हे अभिमानाने सांगू शकतो की, जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची दैना उडवणाऱ्या सेहवागच्या फलंदाजीचा मला साक्षीदार होता आले. फलंदाजीत प्रतिभा असणे ही एक बाब, मात्र वीरूसारखी मानसिकता बनवणे अशक्य आहे. आम्ही एक-एक धावा काढण्याचा विचार करतो, परंतु वीरू प्रत्येकवेळी चौकार मारण्याचा विचार करतो. अनेकांनी त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना वीरूच्या खेळाचा आस्वाद घेण्याचा मी सल्ला दिला.
-महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

वीरेंद्र सेहवागने नेत्रदीपक यशाने या खेळावर आपली छाप पाडली आहे. फलंदाजी आणि आयुष्याकडे बघण्याचा त्याच्या स्वाभाविक दृष्टिकोन आवडतो.
-सचिन तेंडुलकर, माजी महान क्रिकेटपटू

सेहवागने अनोख्या शैलीने जगभरातील चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले. प्रतिस्पर्धी संघाला धास्ती भरवणाऱ्या फलंदाजांपैकी तो एक होता. पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा.
-शशांक मनोहर, बीसीसीआय अध्यक्ष
सेहवागसोबत खेळण्याची संधी मिळाल्याचे भाग्य समजतो. त्याची कारकीर्द अविश्वसनीय आहे. त्याने केलेल्या मार्गदर्शनाचे आभार. आजच्या काळातील तो दिग्गज खेळाडू आहे.
-विराट कोहली, भारताचा फलंदाज

अविश्वसनीय कारकीर्दीबद्दल सेहवागचे अभिनंदन. त्याने आनंद साजरा करण्याचे अनेक क्षण आम्हाला दिले. त्याबद्दल त्याचे आभार.
-गौतम गंभीर, भारताचा सलामीवीर

खरा सलामीवीर, डेअर डेव्हिल. अद्भुत प्रवासाबाबत त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
-शिखर धवन, भारताचा सलामीवीर

आक्रमक खेळ करण्याचा स्पष्ट विचार, हा त्याचा फलंदाजीचा मुख्य गाभा होता. सर्व आनंदाच्या क्षणांसाठी आभार.
-झहीर खान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज