वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताला फेव्हरिट मानले जात होते, मात्र अचूक रणनितीच्या आधारावर केन विल्यमसनच्या नेतृत्वातील न्यूझीलंडने टीम इंडियाला ८ गड्यांनी मात दिली. या पराभवानंतर लोकांनी टीम इंडियावर अनेक मीम बनवले. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शेअर केलेले मीम जास्त चर्चेत आले आहे. सेहवागने लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’मधील एक संवादाचा वापर करत टीम इंडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठीने ‘कालीन भैय्या’, तर अंजुम शर्माने ‘शरद शुक्ला’ची भूमिका साकारली आहे. सेहवागने शेअर केलेल्या मीममध्ये कालीन भैय्या शरद शुक्लाला ”मुझे आपसे बेहतर उम्मीदें थीं”, असे म्हणत आहे. या संवादाचा वापर सेहवागने टीम इंडियासाठी केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला अपेक्षेनुसार चांगली कामगिरी करता आलेली नाही. सेहवागने या मीमद्वारे टीम इंडियाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले आहेत.

 

हेही वाचा – ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला आवडते दिशा पटानी, इंग्लंडमध्ये घ्यायचाय सुट्ट्यांचा आनंद!

अशी रंगली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल

अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास या सर्व घटकांच्या जोरावर न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारताला जखडून ठेवत १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwags mirzapur meme goes viral after indias defeat in wtc final adn
First published on: 25-06-2021 at 18:34 IST