भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला टाटा स्टील चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील शेवटच्या फेरीत निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. त्याला चीनच्या वाँग हाओने पराभूत केले. नॉर्वेच्या मॅग्नुस कार्लसन याने अन्य स्पर्धकांना दीड गुणांनी पिछाडीवर टाकीत निर्विवाद विजेतेपद मिळविले. मानांकनात आनंदपेक्षा खूप खालच्या क्रमांकावर असलेल्या वाँगने आनंदला ४९ चालींमध्ये पराभूत करीत सनसनाटी विजय मिळविला. या पराभवामुळे आनंद तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्याचे आठ गुण झाले. कार्लसन याने दहा गुणांची कमाई केली. लिवॉन आरोनियन याने साडेआठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. आनंद व सर्जी कर्झाकिन यांचे प्रत्येकी आठ गुण झाले मात्र माध्यम गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळाले. पीटर लेको याने पाचवे स्थान मिळविले. त्याचे साडेसात गुण झाले. अमेरिकेचा हिकारू नाकामुरा याने सात गुणांसह सहावे स्थान पटकाविले. भारताच्या पी.हरिकृष्ण याने सातवा क्रमांक मिळवित कौतुकास्पद कामगिरी केली. त्याचे साडेसहा गुण झाले. त्याने शेवटच्या फेरीत हिकारू नाकामुरा याला बरोबरीत ठेवीत अनपेक्षित निकालाची नोंद केली.
शेवटच्या फेरीत कार्लसन याने अनिष गिरी या डच खेळाडूविरुद्ध झटपट बरोबरी स्वीकारली. फॅबिआनो कारुआना व लिवॉन आरोनियन यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. कर्झाकिन या रशियन खेळाडूने नेदरलँड्सच्या लोएक व्हॅनव्हेली याच्यावर उल्लेखनीय विजय मिळविला. एर्विन अलअमी याने इव्हान सोकोलोव्ह याच्याविरुद्धचा डाव अनिर्णित ठेवला. स्पर्धेतील एकमेव महिला खेळाडू यिफान होऊ हिने पीटर लेको याला बरोबरीत रोखून आश्चर्याचा धक्का दिला. यिफान हिने साडेपाच गुणांसह अकरावे स्थान घेतले.