रशियाचा ३-० असा धुव्वा
गॅरेथ बॅलेने आपल्या लाजवाब खेळाने युरो चषक फुटबॉल स्पध्रेवर एक आगळी मोहिनी घातली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात तिसरा गोल झळकावण्याची किमया बॅलेने साधली आहे. त्यामुळे वेल्सने रशियाचा ३-० असा पाडाव करून ‘ब’ गटातून विजेत्याच्या थाटात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
आरोन रामसे आणि नील टेलर यांनी पहिल्या सत्रातच ख्रिस कोलमन्स यांच्या मार्गदर्शनाखालील वेल्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात बॅलेने ही आघाडी वाढवली. त्यामुळे रशियाचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले.
२००४च्या युरा चषक स्पध्रेत साखळीतील तिन्ही सामन्यांत मिलान बारोस (चेक प्रजासत्ताक) आणि रुड व्हा निस्टयरॉय (नेदरलँड्स) यांनी गोल नोंदवण्याचा पराक्रम दाखवला होता. त्यानंतर १२ वर्षांनी बॅलेने हे कर्तृत्व दाखवले.
गेल्या आठवडय़ात मर्सेइल्ले येथे रशिया आणि इंग्लंड यांच्यातील समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर या सामन्यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध १-१ अशा बरोबरीनंतर स्लोव्हाकियाकडून हार पत्करणारा रशियाचा संघ गटात तळाला फेकला गेला.
या सामन्यात बॅलेने प्रारंभीपासूनच रशियाच्या गोलपोस्टवर जोरदार आक्रमण सुरू केले. अर्सेनलचा मध्यरक्षक रामसेने ११व्या मिनिटाला वेल्सचे खाते उघडले. जो अॅलेनच्या अप्रतिम पासवर रामसेने रशियन बचाव भेदत गोलरक्षक अकिनफिव्हला चकवत हा गोल साकारला. रामसेच्या युरो चषक स्पध्रेतील पहिल्यावहिल्या गोलमुळे वेल्स चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. मग २०व्या मिनिटाला टेलरने अकिनफिव्हला दुसऱ्या प्रयत्नात चकवून वेल्सचा दुसरा गोल साधला. गेल्या सहा वर्षांतील टेलरचा हा पहिला गोल ठरला. दुसऱ्या सत्रात बॅलेचा अॅकिनफिव्हशी एकास एक पद्धतीने सामना झाला. पण गोल साकारण्यात बॅले यशस्वी ठरला.