कारकिर्दीचा शेवट जर चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावून केला नाही तर मी संतुष्ट होऊ शकणार नाही, असे मत मँचेस्टर युनायटेड संघाला स्टार फुटबॉलपटू वेन रूनी याने व्यक्त केले आहे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला मँचेस्टर संघाने रूनीला साडेपाच वर्षांसाठी करारबद्ध केले होते. २००८साली तो मँचेस्टर संघात होता, पण २००९ आणि २०११ साली तो बार्सिलोनाकडून खेळला होता. सध्याच्या घडीला मँचेस्टरचे दोन्ही स्थानिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून प्रीमिअर लीगमध्ये त्यांच्या खात्यामध्ये १५ गुण आहेत.
‘‘आम्ही नेहमीच जिंकण्यासाठी खेळतो. प्रत्येक वर्षी तुम्हाला जिंकावेसे वाटत असते, पण ही गोष्ट जवळपास अशक्यप्राय अशीच आहे. पण जेव्हा तुम्ही खरोखर जेतेपद पटकावता तो अद्भुत अनुभव असतो. जेव्हा तुम्ही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचता, तो अनुभव चांगला असतो. कारण तुम्हाला जेतेपदाला गवसणी घालण्याची संधी असते. मला अशी आशा आहे की, यावेळी संघ अशी कामगिरी नक्कीच करेल,’’ असे रूनीने सांगितले.