निवडणूक प्रक्रियेबाबत आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) किंवा केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्या कोणत्याही नियमावलींचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे आयओसीने आमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी येथे सांगितले. आयओएची निवडणूक पाच डिसेंबर रोजी येथे होणार आहे. या संदर्भात मल्होत्रा म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत आम्ही ऑलिम्पिक नियमावली, क्रीडा नियमावली किंवा दिल्ली उच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचा भंग केलेला नाही. निवडणूक आयोगाने कोणाचेही अर्ज फेटाळलेले नाहीत. संघटनेच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीकरिता तीन सदस्य निवडणूक समिती नियुक्त करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व पारदर्शीपणे झाली आहे. आमच्या प्रक्रियेत शासनाची कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही. केंद्रीय क्रीडामंत्र्यांबरोबर झालेली चर्चाही समाधानकारक झालेली आहे. भारतामधील ऑलिम्पिक चळवळीस बाधा येईल, अशी कोणतीही कारवाई आयओसीकडून केली जाणार नाही अशी मला खात्री आहे.