गतविजेत्या विंडीजची फिरकीपुढे भंबेरी

वेस्ट इंडिजने दिलेल्या ५६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचीसुद्धा एकवेळ ४ बाद ३९ धावा अशी तारांबळ उडाली होती.

इंग्लंडचा सहा गडी आणि ७० चेंडू राखून दणदणीत विजय

चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी दुबईचे स्टेडियम गाठणाऱ्या चाहत्यांचा शनिवारी हिरमोड झाला. आदिल रशीद (४/२) आणि मोईन अली (२/१७) या फिरकीपटूंच्या जोडीपुढे गतविजेत्या वेस्ट इंडिजच्या नामांकित फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात इंग्लंडने विंडीजचा सहा गडी आणि ७० चेंडू राखून फडशा पाडला.

वेस्ट इंडिजने दिलेल्या ५६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचीसुद्धा एकवेळ ४ बाद ३९ धावा अशी तारांबळ उडाली होती. परंतु जोस बटलरने (नाबाद २४ धावा) कर्णधार ईऑन मॉर्गनच्या (नाबाद ७) साथीने ८.२ षटकांत संघाचा विजय साकारला. याबरोबरच इंग्लंडने पहिल्या गटात अग्रस्थान मिळवले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना विंडीजने आक्रमकतेच्या नादात एकामागून एक बळी गमावले. ख्रिस गेलव्यतिरिक्त (१३) त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. अलीने लेंडल सिमन्स (३) आणि शिम्रॉन हेटमायर (९) यांचे बळी मिळवले. तर रशीदने धोकादायक किरॉन पोलार्ड (६) आणि आंद्रे रसेल (०) यांच्यासह आणखी दोघांना माघारी पाठवून विंडीजचा डाव अवघ्या १४.२ षटकांत ५५ धावांत गुंडाळला.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : १४.२ षटकांत सर्व बाद ५५ (ख्रिस गेल १३; आदिल रशील ४/२, मोईन अली २/१७) पराभूत वि. इंग्लंड : ८.२ षटकांत ४ बाद ५६ (जोस बटलर नाबाद २४, जेसन रॉय ११; अकील होसेन २/२४)

’ सामनावीर : मोईन अली

’ गुण : इंग्लंड २, वेस्ट इंडिज ०

२ सर्व बाद ५५ ही वेस्ट इंडिजची ट्वेन्टी-२०मधील दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. २०१९मध्ये इंग्लंडविरुद्धच त्यांचा ४५ धावांत खुर्दा झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West indies vs england won by six wickets and 70 balls akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या