करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशातील महत्वाच्या स्पर्धांवर गंडात आलेलं आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे अनेक संघांनी आपले ट्रेनिंग कँप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि इतर महत्वाचे खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. मात्र महेंद्रसिंह धोनीच्या दृष्टीकोनातून यंदाची आयपीएल स्पर्धा ही अत्यंत महत्वाची होती. भारतीय संघात आपलं स्थान बळकट करण्यासाठी आयपीएलमध्ये धोनीने चांगली कामगिरी करणं अपेक्षित होतं.
अवश्य वाचा – Coronavirus : RCB ने ट्रेनिंग कँप केला रद्द, खेळाडूंची सुरक्षा महत्वाची
वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळणार आहे. २०१९ वन-डे विश्वचषकानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मध्यंतरी ऋषभ पंतच्या खराब कामगिरीमुळे धोनीला पुन्हा संघात स्थान देण्यात यावी अशी मागणी होत होती. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आयपीएलमधील कामगिरीवर धोनीचं भारतीय संघातलं पुनरागमन अवलंबून असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर…धोनीचे संघात पुनरागमनासाठीचे सर्व दरवाजे बंद होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
मात्र भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राला हे मान्य नाही. आयपीएलमधली कामगिरी हा धोनीची संघात निवड करण्यासाठी निकष ठरु शकत नाही असं मत आकाशने व्यक्त केलंय. “धोनी सारख्या खेळाडूला संघात पुनरागमन करण्यासाठी आयपीएलची मदत कधीच लागणार नाही. जर त्याला संघात पुनरागमन करायचं असेल तर तो तसं कळवेल. जर निवड समितीला धोनी संघात हवा असेल तर त्याची निवड होईल. धोनी प्रचंड अनुभवी खेळाडू आहे, आणि हा अनुभव बाजारात मिळत नाही. समजा त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर लगेच लोकं त्याची निवड करा असं म्हणतील. पण काय करायचं आहे आणि नाही हे त्याला माहिती आहे.” आकाश चोप्रा आपल्या यू-ट्युब चॅनलवरील कार्यक्रमात बोलत होता.
अवश्य वाचा – करोनाबद्दल अफवा पसरवू नका, सुरेश रैनाचं चाहत्यांना आवाहन
बीसीसीआय सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. १५ तारखेपासून स्पर्धा सुरु झाल्यास…तिचं स्वरुप कसं असेल याबद्दल चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात आयपीएलचं भवितव्य नेमकं काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
