भारत आणि इंग्लडदरम्यान सुरु असणाऱ्या टी-२० मालिकेमधील तिसरा सामना भारताने गमावला. इंग्लंडने अहमबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात आठ गडी राखून यजमान संघावर मात केली. या विजयाबरोबरच पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली असून आता भारताला मालिका जिंकण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर संघ निवडीवरुन कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही दुसऱ्या सामन्यामध्ये संधी देण्यात आलेल्या सूर्यकुमार यादवला संघाबाहेर ठेवण्यावरुन विराटवर टीका केली आहे. सूर्यकुमारसारख्या खेळाडूला संघाबाहेर बसवून ठेवण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न गंभीरने उपस्थित केलाय.

सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांनीही इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पदार्पण केलं. टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर नवीन खेळाडूंना संधी देत संघ अधिक मजबूत बनवण्याच्या हेतूने सध्या टीम इंडियामध्ये प्रयोग सुरु आहेत. मागील बऱ्याचा काळापासून सूर्यकुमार आणि इशानला भारतीय संघामध्ये स्थान मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात हे दोघेही संघामध्ये होते. इशानने सलामीला फलंदाजी करत अर्धशतकाच्या जोरावर भारताला विजय मिळवून देत सामनावीर पुरस्कारावर नावही कोरलं. मात्र सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिसऱ्या टी २० सामन्यामध्ये सलामीवीर रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आल्याने सूर्यकुमारला संघातून बाहेर काढण्यात आलं. मात्र विराटच्या निर्णयावरुन गौतम गंभीरने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना नाराजी व्यक्त केलीय. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादवसारख्या क्रिकेटपटूला संघात जास्तीत जास्त वेळा स्थान दिलं पाहिजे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाला सूर्यकुमारला टी-२० विश्वचषकामध्ये खेळवता येईल की नाही यासंदर्भातील निर्णय घेता येईल असं मत गंभीरने व्यक्त केलं आहे.

“मला आश्चर्य वाटतंय की विश्वचषकाच्या चार महिने आधी तुम्ही विश्वचषकासाठी तयारी सुरु करता आणि विश्वचषकनंतर तुम्ही पुढील विश्वचषकाची तयारी सुरु करेल. खरं तर याला फारसं महत्व नसतं. तुमचा फॉर्म कसा आहे हे महत्वाचं असतं. समजा एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर तुम्ही काय करणार आहात. सूर्यकुमार यादवचा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ पाहिला आहे का? कोणाला दुखापत होऊ नये, पण झालीच तर चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळणारं कोणीतरी हवं ना. उदाहरण घ्यायचं झालं तर श्रेयस अय्यरच्याऐवजी एखादा खेळाडू खेळवायचा झाल्यास तुम्ही कोणाला खेळवणार?,” असा प्रश्न गंभीरने सध्याच्या संघाकडे पाहून उपस्थित केला आहे.

“त्यामुळेच या संघामध्ये जागा घेऊ शकेल अशा खेळाडूचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही त्याला (सूर्यकुमार यादवला) तीन किंवा चार सामन्यांमध्ये संधी देऊन तो कसा खेळतो हे पाहिलं पाहिजे. जर तो चांगला खेळला तर तुम्ही चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूसाठी बॅकअप निर्माण केला पाहिजे. तुमच्याकडे एखादा खेळाडू असेल तर त्याला मालिकेमध्ये खेळवा आणि तो कसा खेळ करतो ते पाहा. आपण केवळ विश्वचषकाच्या तयारीबद्दल चर्चा करतो पण सध्या जे सुरु आहे ती काही तयारी म्हणता येणार नाही. मागील अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या खेळाडूंनाच तुम्ही सतत संधी देत आहात,” असं म्हणत गंभीरने विराटने सूर्यकुमारला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.

सध्याच्या संघामध्ये पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला खेळवता येऊ शकतो. पहिल्या सामन्यामध्ये ६७ धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात आठ तर तिसऱ्या सामन्यात श्रेयसने ९ धावा केल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सूर्यकुमार यादवला अजून एखादा सामना संघाबाहेरच बसावं लागणार आहे. मालिकेतील चौथ्या सामन्याचा निकाल आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर सूर्यकुमारला संघात स्थान देण्यात येणार की नाही हे पाचव्या सामन्याच्या आधी समजू शकेल असं सांगितलं जात आहे.