Why Nehal Vadhera Naman Dhir Relay Catch Overruled ICC Rule: आशिया चषक रायझिंग स्टार २०२५ स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान शाहीन्स यांच्यातील सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानी संघाने १३.२ षटकांत भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पंचांनी घेतलेल्या निर्णयावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला. पाकिस्तानी फलंदाज माझ सदाकतचा झेल होता, ज्याला नाबाद घोषित देण्यात आले. पण त्याला नाबाद देण्यामागे आयसीसीचा नियम नेमका काय सांगतो, जाणून घेऊया.
प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने १३६ धावा केल्या. पाकिस्तानकडून डावाची सुरुवात करताना माज सदाकतने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. त्याने फक्त ३१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या अर्धशतकानंतर, वैभव सूर्यवंशीने त्याचा एक सोपा झेल सोडला आणि त्याला जीवदान मिळाल.. यानंतर सुयश शर्माच्या चेंडूवर तो झेलबाद झाला, पण तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद दिलं, यावरून मोठा वाद पाहायला मिळाला.
दहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सदाकत झेलबाद झाला. यावेळी, लाँग-ऑनवर असलेल्या नेहल वधेराने सीमारेषेजवळ झेल घेतला. पण सीमारेषा ओलांडण्यापूर्वीच त्याने तो चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे फेकला आणि झेल पूर्ण केला. भारतीय अ संघासह सर्वांनाच वाटलं की सदाकत झेलबाद झाला. सादाकत मैदानाबाहेर गेला आणि नवा फलंदाजही मैदानावर आला.
अनेक वेळा रिप्ले पाहिल्यानंतर, हे स्पष्ट झालं की वधेराने सीमारेषेला स्पर्श न करता चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे वेळेत फेकला होता. तो स्पष्टपणे बाद असल्याचं दिसून आलं, परंतु तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद दिलं. हे पाहून, भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले आणि निर्णयावर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली, तर भारतीय प्रशिक्षकांनीही चौथ्या पंचांशी निर्णयावर चर्चा करण्यास सुरुवात केली.
आयसीसीच्या नव्या नियमामुळे पंचांनी बदलला निर्णय
माज सदाकत झेलबाद असतानाही त्याला पंचांनी नाबाद देणं नव्या नियमानुसार अगदी योग्य असल्याचं दिसत आहे. जून २०२५ मध्ये आयसीसीने नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलसह बाउंड्री कॅचशी संबंधित नियमांमध्ये तीन बदल केले आणि ‘रिले कॅच’शी संबंधित तिसरा नियम येथे लागू झाला. यानुसार, जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सीमा ओलांडण्यापूर्वी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फेकला, तर चेंडू डेड होण्यापूर्वी त्या क्षेत्ररक्षकालाही सीमारेषेच्या आत परत यावे लागेल, तरच तो झेल मानला जाईल. असं नसल्यास पंच चौकार व षटकार देतील.
याचा अर्थ असा की नेहल वधेराने नमन धीरकडे वेळेत चेंडू टाकला होता, परंतु दुसऱ्या खेळाडूने झेल घेण्यापूर्वी नेहाल वधेरा स्वतः सीमारेषेच्या आत परतला नाही. नमनने जेव्हा झेल टिपला तेव्हा तो सीमारेषेबाहेर होता. परिणामी, पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलं. पण याचा फायदा पाकिस्तानला झाला आणि भारताचं मात्र झालं. पण, पंचांनीही हा निर्णय देताना चूक केली, नाबाद दिल्यानंतर त्यांनी चौकार न देता तो डॉट बॉल दिला.
