माजी उपविजेता महाराष्ट्र संघ यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत हरयाणाविरुद्ध सलामी करीत असून, त्यासाठी त्यांनी अनुभवी खेळाडूंवरच भिस्त ठेवली आहे. यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडेच संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी महाराष्ट्राच्या १६ खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष रियाज बागवान यांनी हा संघ जाहीर केला. गतवर्षी महाराष्ट्राने उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. उपांत्य फेरीत त्यांना तामिळनाडूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात खेळलेल्या खेळाडूंमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या विजय झोलला यंदाच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाकडून शतक टोलवणाऱ्या केदार जाधवसोबत हर्षद खडीवाले, स्वप्निल गुगळे, चिराग खुराणा, राहुल त्रिपाठी या अनुभवी फलंदाजांवर महाराष्ट्राची मदार राहणार आहे. त्यांच्याबरोबरच विजय झोल, संग्राम अतितकर यांच्याकडूनही फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
अंकित बावणे, श्रीकांत मुंडे, अक्षय दरेकर या अष्टपैलू खेळाडूंकडून यंदाही चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. गोलंदाजीत समाद फल्लाह, डॉमिनिक मुथ्थुस्वामी व अनुपम संकलेचा यांच्यावरही महाराष्ट्राचे यशापयश अवलंबून आहे.
महाराष्ट्र संघ : रोहित मोटवानी (यष्टीरक्षक व कर्णधार), हर्षद खडीवाले, स्वप्निल गुगळे, केदार जाधव, अंकित बावणे, चिराग खुराणा, राहुल त्रिपाठी, संग्राम अतितकर, नौशाद शेख, विजय झोल, अक्षय दरेकर, श्रीकांत मुंडे, समाद फल्लाह, निकित धुमाळ, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, अनुपम संकलेचा. प्रशिक्षक : डेव्हिड अँड्रय़ुज.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wicketkeeper rohit motwani to lead maharashtra ranji team
First published on: 30-09-2015 at 00:52 IST