टेनीसमध्ये मानाचं स्थान असलेल्या विम्बल्डन ओपन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अनेक प्रस्थापितांना या स्पर्धेत धक्के बसले असून अनेक नवोदीत या स्पर्धेत आगेकूच करतायत. सामना जिंकल्यानंतर टेनीसपटू आपला बॉल किंवा रिस्ट बँड भेट म्हणून प्रेक्षकांना देत असतात. प्रत्येक टेनीस स्पर्धेत खेळाडू आपल्या चाहत्यांसाठी ही कृती हमखास करतातच.

जागतिक क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर असलेल्या जॅक सॉक या अमेरिकेच्या खेळाडूनेही आपला सामना जिंकल्यानंतर विम्बल्डन चा टॉवेल प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका लहानग्याकडे भिरकावला. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच स्टँड मध्ये बसलेल्या एका खवट म्हाताऱ्याने लहानग्याकडून ‘सॉक’चा टॉवेल हिसकावून घेतला. यामुळे जॅक सॉकचा तो चाहता काहीवेळासाठी हिरमुसला. मात्र हा प्रकार काही जणांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाच.

हा प्रकार सॉकला समजताच त्याने त्वरित आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना ‘त्या’ लहान मुलाला शोधण्याची विनंती केली. तो मुलगा जर कोणाला सापडला तर मला नक्की कळवा, मी स्वत: त्याला विम्बल्डनचा नवीन टॉवेल देईन अशा आशयाचं ट्विटही सॉकने केलं आहे.

जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या जॅक सॉकने चिलीच्या ख्रिश्चन गॅरीनचा ६-३, ४-६, ७-६, ६-३ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जॅकचा सामना ऑस्ट्रियाच्या सबॅस्टियन ऑपनरसोबत होणार आहे.