वृत्तसंस्था, लंडन : माजी विम्बल्डन विजेती अँजलिक कर्बर आणि पाचव्या मानांकित मारिआ सक्कारीचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. पुरुषांच्या गटात अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, टॉमी पॉल आणि डेव्हिट गॉफिन यांनी आगेकूच केली, तर महिला एकेरीत तृतीय मानांकित ओन्स जाबेऊर, एलिस मेर्टेन्स आणि तात्जाना मारिआ यांनी विजय नोंदवले.

पुरुष एकेरीत जोकोव्हिचने सर्बियाच्याच मिओमिर केचमानोव्हिचला ६-०, ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले. सामन्याच्या सुरुवातीपासून जोकोव्हिचने प्रतिस्पर्धी खेळाडूस पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. अमेरिकेच्या पॉलने चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लेला ६-३, ६-२, ६-२ असे पराभूत केले, तर बेल्जियमच्या गॉफिनने फ्रान्सच्या उगो हम्बर्टला चुरशीच्या लढतीत ४-६, ७-५, ६-२, ७-५ असे नामोहरम केले.

महिलांमध्ये तिसऱ्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरने फ्रान्सच्या डिआने पॅरीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवत पुढची फेरी गाठली. बेल्जियमच्या मेर्टेन्सने कर्बरवर ६-४, ७-५ असा विजय साकारला, तर जर्मनीच्या मारियाने सक्कारीला ६-३, ७-५ असे हरवून आश्चर्यकारक निकाल नोंदवला.

सानिया-पॅव्हिच जोडीचा विजय

भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा साथीदार मॅट पॅव्हिच जोडीने मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत स्पेनच्या डेव्हिड वेगा हर्नाडेझ आणि जॉर्जियाच्या नटेला झाल्मीड्झे जोडीला ६-४, ३-६, ७-६ (३) असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली. भारताचा रामकुमार रामनाथन आणि त्याचा बोस्निया व हर्झेगोव्हिनाचा साथीदार टोमिस्लाव्ह बर्किच जोडीने पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतच अमेरिकेच्या निकोलस मोनरोए व टॉमी पॉल जोडीकडून ३-६, ६-७ (५), ६-७ (५) असा पराभव पत्करला.

किर्गियोसला दंड

निक किर्गियोसला पहिल्या फेरीतील सामन्यादरम्यान केलेल्या गैरवर्तणुकीसाठी १० हजार डॉलर्सचा दंड आकारण्यात आला आहे.