जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यामधील वादविवादाची चांगलीच चर्चा रंगत असून दोन्ही क्रिकेट मंडळेही एकमेकांसमोर उभी ठाकली असून आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. कोणतीही गोष्ट ही पुराव्याने सिद्ध होत असते आणि अँडरसन व जडेजा यांच्यातील वादविवादाचे दृक्श्राव्य पुरावेच नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आयसीसी मंगळवारी करणार असून आता पुरावे नसल्यावर कुणाला कशी शिक्षा करणार, हा प्रश्न बऱ्याच जणांपुढे पडला आहे.
हे वृत्त समजल्यावर भारताच्या अधिकाऱ्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन्ही खेळाडूंना पुरावे सादर करणे क्रमप्राप्त असून यासाठी ड्रेसिंगरूमबाहेरील कॅमेराचे चित्रीकरण देण्याची विनंती केली आहे.
नॉटिंगहॅमशायरच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, जिथे हा प्रकार घडला तिथे कॅमेरा लावलेला होता, पण त्या वेळी कॅमेरा चालू करण्यात आलेला नव्हता.
कुककडून कप्तानी काढून घ्यावी -वॉन
आता अशी परिस्थिती आली आहे की, कुक क्रिकेटचा आनंद लुटतोय, असे वाटत नाही. संघ अडचणीत सापडला असताना कर्णधाराने पुढाकार घेत संघाला सुस्थितीत न्यायचे असते. पण कुककडून तसे पाहायला मिळत नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्याकडून वाईट रणनीतीचा अवलंब होत आहे, त्यामुळे मंडळाने कुककडून कप्तानी काढून घ्यावी, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आपल्या स्तंभात व्यक्त केले आहे.