पुरुष क्रिकेटपटू खेळातून ग्लॅमर, पैसा, यश सगळंच मिळवत असताना महिला क्रिकेटपटूंकडे कुणी वळूनही बघत नव्हते, पण १५ मे २०१७ या दिवसाने भारतीय महिला क्रिकेटपटूंचं जगच बदलून टाकलं आहे.
दुख भरे दिन बीते रे भया.. ‘मदर इंडिया’ या जुन्या चित्रपटातील हे गाणे भारतीय महिला क्रिकेटच्या सद्य:स्थितीचे यथार्थ दर्शन घडवते. महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी जेव्हा भारतीय संघ इंग्लंडला निघाला, तेव्हा या संघाकडून अतिशय माफक अपेक्षा केल्या जात होत्या. परंतु या स्पध्रेने महिला क्रिकेटचा चेहरामोहराच पालटून टाकला आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला क्रिकेटविषयी लोक चर्चा करायला लागले. प्रसारमाध्यम, समाजमाध्यमांवर त्यांच्या लोकप्रियतेने कळस गाठला. त्यांचा खेळ, संघर्ष, अदाकारी या साऱ्याविषयी लोकांना उत्सुकता निर्माण झाली. हा संघ जेव्हा भारतात आला, तेव्हा मुंबईतील स्वागत आणि त्यानंतर मुंबई-नवी दिल्लीतील सत्कार कार्यक्रमांमध्येच त्या इतक्या व्यस्त होत्या की घर गाठायला त्यांना चार दिवस लागले. काही दिवसांपूर्वी या जवळून फिरकल्या तरी फारसे महत्त्व दिले गेले नव्हते, परंतु आता मात्र त्यांची दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षांव होत आहे.
मागील एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या महिलांच्या दोन्ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात झाल्या होत्या, हे आता कुणाला सांगितल्यास विश्वास बसेल. २०१३मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पध्रेतील भारताचे साखळी सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आले होते. एक विजय आणि दोन पराभवांमुळे साखळीतच भारतीय संघाला गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर कटकच्या बाराबती स्टेडियमला झालेल्या प्ले-ऑफच्या सामन्यात पाकिस्तानला हरवल्यामुळे भारताला जेमतेम सातवे स्थान मिळाले होते. याचप्रमाणे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतही भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. एक विजय आणि तीन पराजय अशी भारताची निराशाजनक कामगिरी झाली होती. मोहालीतील विजयासह एकीकडे भारताच्या पुरुषांच्या संघाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले, तर महिलांच्या वाटचालीपुढे पूर्णविराम दिला गेला. पंजाब विमानतळावर पुरुष संघाच्या निरोपासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र त्याच वेळी विमानतळावर आलेल्या महिला संघाविषयी कुणालाच फारसे स्वारस्य नव्हते.
भारतीय संघ यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी पात्र ठरला तोच मुळी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून. गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांत खेळण्यास नकार दिल्यामुळे भारतीय महिलांना या स्पध्रेसाठी थेट पात्र होता आले नाही. त्याऐवजी वर्षांच्या पूर्वार्धात श्रीलंकेत झालेली पात्रता स्पर्धा भारत खेळला. या स्पध्रेतील चारपैकी चार सामने जिंकून भारताने स्वप्न साकारले. महिलांच्या क्रिकेट सामन्यांच्या वेळी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे टाळणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अशा प्रकारचा निर्णय पुरुषांच्या क्रिकेटसाठी कधीही घेतला नव्हता.
तसे पाहिल्यास १५ मे २०१७ या दिवशी भारताच्या महिला क्रिकेटने सर्वप्रथम क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधले. या वेळी पुरुष क्रिकेटपटू भारतात आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळून कोटय़वधी रुपयांची बिदागी घेत होते, हे वेगळे सांगायला नको. या दिवशी दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या सलामीवीर जोडीने सलामीच्या विकेटसाठी ३२० धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात भारताने ५० षटकांत ३ बाद ३५८ धावांचा डोंगर उभारला होता. दुखापतीमुळे पूनमला मैदान सोडावे लागले म्हणून ही भागीदारी खंडित झाली, अन्यथा हा विक्रम आणखी उंचावला असता. दीप्तीने १६० चेंडूंत २७ चौकार आणि २ षटकारांसह १८८ धावा केल्या, तर पूनमने १६ चेंडूंत ११ चौकारांसह १०९ धावा केल्या. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांमध्ये जशी मिताली राज अग्रेसर आहे, तसेच सर्वाधिक बळी झुलन गोस्वामीच्या नावावर आहेत. यंदाच्या वर्षांतच हे दोन विक्रम भारतीय महिला खेळाडूंनी पादाक्रांत केले असून, यातून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसून येते.
यंदाच्या विश्वचषक स्पध्रेत भारताने सलामीच्याच लढतीत यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. मग ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला धूळ चारली. त्यानंतर साखळीतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या सहा वेळा विश्वविजेत्या संघावर आश्चर्यकारक विजय मिळवला आणि नंतर अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी हाराकिरी पत्करल्यामुळे थोडक्यात विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली.
भारताच्या या उपविश्वविजेतेपदाच्या प्रवासात कर्णधार मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, पूनम यादव, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड यांचे महत्त्वाचे योगदान होते. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मितालीचा (४०९ धावा) दुसरा क्रमांक लागतो. या यादीत अव्वल असणाऱ्या इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंटच्या खात्यावर फक्त एक धाव जास्त आहे. मितालीने विश्वचषकात एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली. याचप्रमाणे पूनम राऊतने सातत्याने फलंदाजी करीत एकंदर ३८१ धावा (एक शतक, दोन अर्धशतके) केल्या. अंतिम फेरीतील तिची ८६ धावांची झुंजार खेळी ही वाखाणण्याजोगी होती. हरमनप्रीत कौरने उपांत्य फेरीतील आक्रमक हल्ल्यातून ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप सावरला नसेल. १९८३मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताची ५ बाद १७ अशी त्रेधातिरपीट उडाल्यानंतर कपिल देवने झुंजार खेळी साकारून संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला होता. त्याच खेळीची आठवण करून देणारी नाबाद १७१ धावांची खेळी हरमनप्रीतने साकारली. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे फटकेबाजी महिला क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही, हा समज तिने आपल्या आतषबाजीने दूर केला. हरमनप्रीतने ११५ चेंडूंत २० चौकार आणि ७ षटकारांसह आपली खेळी फुलवली. भारताच्या पहिल्या दोन विजयांमध्ये सांगलीच्या स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय भारताच्या वेगवान माऱ्याने आणि फिरकी गोलंदाजीने आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या.
विश्वचषक स्पध्रेनंतर महिला संघ भारतात परतल्यानंतर या संघासाठी पुढील स्पर्धा किंवा दौरा कोणता असणार? या संघाकडे आता तरी प्रायोजक वळणार का? असे काही प्रश्न आपसूकच समोर उभे आहेत. परंतु भविष्यातील आशादायी चित्र मात्र या स्पध्रेमुळे जरूर निर्माण झाले आहे. भारतीय महिला संघ गेल्या दहा वर्षांत फक्त पाच कसोटी सामने खेळला आहे. एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे खेळाची लोकप्रियता जरी वाढत असली तरी कसोटी क्रिकेट वाढले, तरच दर्जेदार खेळाडू घडण्यास मोठी मदत होईल, हे मिताली राजचे मत नक्कीच विचार करण्याजोगे आहे.
विश्वचषकात प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील १५ खेळाडूंपैकी १० खेळाडू भारतीय रेल्वेत नोकरी करतात. यापलीकडे एअर इंडिया, पोलीस अशा माफक ठिकाणी महिला क्रिकेटला संधी आहे. त्यामुळे रेल्वेतून खेळते, असे सांगून त्यांच्या राज्य संघटना नाके मुरडत होत्या. परंतु त्यांनीसुद्धा विश्वचषकातील कामगिरीनंतर या महिला खेळाडूंचे कौतुक केले आहे.
भारतात महिला क्रिकेटसाठी होणाऱ्या स्पर्धा अतिशय नगण्य आहेत. या स्पध्रेच्या संख्येत वाढ करणे, प्रशिक्षण शिबिरांचे मोठय़ा प्रमाणात आयोजन करणे, नोकऱ्यांच्या संधी अधिकाधिक उपलब्ध करून देणे, याची नितांत आवश्यकता आहे.
पुरुषांच्या क्रिकेटला आर्थिक ताकद आणि ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगसारखी एखादी ट्वेन्टी-२० स्पर्धा महिलांचीसुद्धा व्हावी, अशी अपेक्षा गेल्या काही दिवसांत अनेक आजी-माजी महिला खेळाडूंनी व्यक्त केली. महिलांची आयपीएल स्पर्धा इतक्या लवकर तरी वास्तवात येणे कठीण आहे, असे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे. परंतु अशा प्रकारची एखादी लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सुरू करायला काहीच हरकत नाही. तूर्तास, भारतीय महिला क्रिकेटला आलेले ‘अच्छे दिन’ येत्या काही दिवसांत कोणती उंची गाठतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा
