गोलंदाजांनी गाजविलेल्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर १२ धावांनी मात करीत महिलांच्या अखिल भारतीय ट्वेन्टी-२० सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत आगेकूच राखली.
पूना क्लब येथे झालेल्या या लढतीत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकांत सर्व बाद ९१ धावा केल्या. त्यामध्ये अनघा देशपांडे (२२) व स्मृती मंधाने (३५) यांनी दमदार फलंदाजी केली. मध्य प्रदेशकडून निधी बुलियाने तीन बळी घेतले तर रंजना गुप्ता व रचिता बुलिया यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. विजयासाठी ९२ धावांच्या आव्हानास सामोरे जाताना मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. श्वेता मिश्रा (३०) व पूजा चौधरी (२०) या दोनच फलंदाज दमदार खेळ करु शकल्या.
संक्षिप्त निकाल
महाराष्ट्र १८.३ षटकांत सर्व बाद ९१ (अनघा देशपांडे २२, स्मृती मंधाने ३५, निधी बुलिया ३/१८, रंजना गुप्ता २/८, रचिता बुलिया २/९) विजयी वि. मध्य प्रदेश २० षटकांत ८ बाद ७९ (श्वेता मिश्रा ३०, पूजा चौधरी २०, श्वेता माने २/१०)