ऋषिकेश बामणे

आपला भारत देश हा कोणत्याही क्रीडा प्रकाराचे सामने खेळण्यापेक्षा ते पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी ओळखला जातो. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या बाबतीत ही बाब तंतोतंत लागू होते. २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत धडक मारल्यामुळे भारतातील महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडली. भारताच्या हातून विश्वविजेतेपद निसटले, परंतु त्यांच्या झुंजार वृत्तीची जगभरातून प्रशंसा झाली. मिताली राज, झुलन गोस्वामी या अनुभवी शिलेदारांना स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा या नवतारकांची साथ लाभल्याने भारताचे भविष्य सुरक्षित असल्याची खात्री पटली. मात्र आता बरोब्बर चार वर्षांनी पुन्हा एकदा महिला क्रिकेटची गाडी रुळावरून घसरली असून यासाठी भारतीय खेळाडूंची कामगिरीच जबाबदार आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. काही आठवडय़ांपूर्वीच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात फॉलोऑन पत्करणाऱ्या भारताने दुसऱ्या डावात झुंज देत लढत किमान अनिर्णीत राखली. मात्र एकदिवसीय मालिकेत तिसऱ्या सामन्यापूर्वीच इंग्लंडने २-० अशी आघाडी घेत भारतीय संघाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. मार्च-एप्रिल महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेतसुद्धा भारताला अनुक्र मे १-४ आणि १-२ असे पराभवाला सामोरे जावे लागले.

गतवर्षी भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर थेट यंदा मार्चमध्ये भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानावर उतरला. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होणे स्वाभाविक होते. मात्र आफ्रि का आणि इंग्लंड या दोन्ही संघांविरुद्धच्या पराभवात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. मिताली आणि सध्या तिन्ही प्रकारांत भारतासाठी धडाकेबाज कामगिरी करणारी युवा शफाली वर्मा या दोघींव्यतिरिक्त एकालाही कामगिरीत सातत्य राखणे जमलेले नाही. अनुभवी फलंदाज हरमनप्रीतची खालावलेली कामगिरी संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे. २०१७च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत हरमनप्रीतने १७१ धावांची तुफानी खेळी साकारली. मात्र त्यानंतर झालेल्या २८ एकदिवसीय लढतींमध्ये हरमनप्रीतने अवघी दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे मितालीवरील दडपणात आपसूकच वाढ होत आहे. यामुळे ५० षटकांच्या सामन्यात निर्धाव चेंडूंचे प्रमाणही वाढत असून भारताला जेमतेम २०० धावांपर्यंत मजल मारता येत आहे.

मानधना आणि शफाली यांची सलामी जोडी उत्तमरीत्या जुळून आली आहे. कसोटी सामन्यात या दोघींनी पहिल्या डावात अर्धशतके झळकावून एक वेळ भारताला वर्चस्वाची संधी निर्माण करून दिली. मात्र मधल्या फळीचे अपयश भारताला महागात पडले. आफ्रि के विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पूनम राऊतचा सूरही सध्या हरपला आहे, तर जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती यांना सातत्य राखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी विश्वचषकाच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

फलंदाजीव्यतिरिक्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात भारताची कामगिरी संमिश्र स्वरूपाची पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज झुलन आणि फिरकीपटू पूनम यादव भारतासाठी नेहमीच मोलाची भूमिका बजावत आल्या आहेत. मात्र अन्य गोलंदाजांकडून त्यांना पुरेशी साथ मिळालेली नाही. पाच वर्षांनी संघात पुनरागमन करणाऱ्या स्नेह राणाच्या अष्टपैलू योगदानामुळे भारताला किमान दिलासा मिळाला आहे.

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये ४ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ आधीच पात्र झाला आहे. मात्र २०१७ प्रमाणे या वेळीही अंतिम फेरीपर्यंत धडक मारायची असल्यास भारताने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. विशेषत: चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्टय़ांवर भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. तेथे भारताला प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० लढती खेळायच्या आहेत. त्यामुळे आता उपलब्ध असलेल्या मर्यादित संधींमधून भारत विश्वचषकासाठी कशाप्रकारे सज्ज होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

rushikesh.bamne@expressindia.