भारतीय कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांना आशा
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा तिसरा हंगाम क्रीडारसिकांच्या उत्तम प्रतिसादात सुरू आहे. यंदापासून वर्षांतून दोनदा प्रो कबड्डी लीगचा मोसम बहरणार आहे. या कबड्डी लीगमुळे पुरुषांच्या कबड्डीला सोन्याचे दिवस पाहायला मिळत आहेत. मात्र महिलांची प्रो कबड्डी लीग केव्हा सुरू होणार, हा प्रश्न ऐरणीवर आहे. लीगचे संयोजक स्टार स्पोर्ट्स आणि मशाल स्पोर्ट्स याविषयी गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे लवकरच महिलासुद्धा प्रो कबड्डीत खेळतील, अशी आशा आहे. भारताप्रमाणेच इराण, थायलंड, कोरिया या देशांमध्येही गुणी महिला खेळाडू असल्यामुळे महिला प्रो कबड्डी लीग पुरुषांप्रमाणेच यशस्वीसुद्धा होईल, असे मत भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांनी व्यक्त केले.
महिला प्रो कबड्डी लीगच्या चर्चेबाबत मनोगत व्यक्त करताना द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक प्रसाद राव म्हणाले, ‘‘महिलांची प्रो कबड्डी लीग व्हावी, ही क्रीडारसिकांची मागणी वाढत आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या वेळी आम्ही पाहिले की, महिलांमध्ये आक्रमणची आणि झगडण्याची वृत्ती अधिक असते. पुरुषांचा कबड्डी सामना बऱ्याचदा शांतपणे चालतो, तर महिलांचा वेगवान असतो. याचप्रमाणे मैदानाचे क्षेत्रफळही छोटे असते. महिलांच्या कबड्डीत रंगत अधिक असल्यामुळे ती पाहायला प्रेक्षकांना अधिक आवडतात.’’
..म्हणून परदेशी खेळाडूच बाद होतात!
चढाईपटूने ‘कबड्डी.. कबड्डी..’ उच्चारणे हा तसा वादग्रस्त विषय आहे. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक, आशियाई आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या वेळी याबाबत बऱ्याचदा आमची गांभीर्याने चर्चा झाली होती. सर्वप्रथम एका श्वासात हे शब्द उच्चारत राहण्याचे बंधन आम्ही दूर केले. कारण त्यामुळे कौशल्यापेक्षा श्वासावर खेळाडूचे लक्ष केंद्रित होत होते. त्यानंतर अविरतपणे कबड्डी शब्दाचा जप करणे अनिवार्य करण्यात आले.
यंदा वापरण्यात आलेल्या माइकमुळे त्याचे निरीक्षण करता येऊ लागले आहे. हे शब्द उच्चारणे सवयीचे नसल्यामुळे बहुतांशी परदेशी खेळाडूच बाद
होत असल्याचे लीगमध्ये दिसून आले आहे.

पंचगिरीचा दर्जा सुधारला
प्रो कबड्डीमुळे देशभरातील पंचगिरीचा दर्जा सर्वच पातळीवर कमालीचा सुधारला आहे. टीव्हीवरील सामने पाहून पंचांनी आपल्या तंत्रात अतिशय सुधारणा केल्याचे पाहायला मिळत आहे. प्रो कबड्डीसाठी पंचांना तयार करताना त्यांची देहबोली, तंत्रज्ञान यावर विशेष मेहनत घेण्यात आली होती.
आणखी काही परदेशी खेळाडू चमकतील
कबड्डीची क्रिकेटसोबत तुलना करण्याची घाई करू नये. प्रो कबड्डीच्या प्रत्येक संघातून परदेशी खेळाडूसुद्धा खेळताना दिसावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इराण, कोरिया, पाकिस्तान या देशांतील खेळाडू भारतीय खेळाडूंसोबत खेळण्याच्या दर्जाचे आहेत. दक्षिण कोरियाचा जँग कुन ली, इराणचा मेराज शेख हे तारे प्रो कबड्डीच्या क्षितिजावर तेजाने तळपत आहेत. अजून काही हंगामांनंतर आणखी काही परदेशी खेळाडू चमकताना दिसतील अशी आशा आहे.