‘‘आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे सामने एमआयजी मैदानावर होणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, दोन सराव आणि दोन आंतरराष्ट्रीय सामने या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या प्रतिनिधींसमवेत आमची बैठक आहे. या बैठकीत एमआयजीच्या वाटय़ाला आणखी काही सामने येण्याची चिन्हे आहेत,’’ अशी माहिती एमआयजी क्रिकेट क्लबचे सरचिटणीस आशिष पाटणकर यांनी दिली.
आयसीसीने जाहीर केलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या कार्यक्रमानुसार, एमआयजीवर २८ जानेवारीला वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया आणि २९ जानेवारीला श्रीलंका-दक्षिण आफ्रिका असे दोन सराव सामने होणार आहेत. यानंतर ३ फेब्रुवारीला श्रीलंका-वेस्ट इंडिज यांच्यात तर, १३ फेब्रुवारीला प्ले-ऑफचा सामना होणार आहे. पाटणकर यांनी पुढे सांगितले की, ‘‘मुंबईचा संघ वानखेडे स्टेडियमवर २६ ते ३० जानेवारी या कालावधीत रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे या मैदानावरील सर्व सामने अन्यत्र हलविण्यात येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर एमआयजीवर आणखी काही सामने होण्याची शक्यता आहे. एमआयजीवर विश्वचषक स्पध्रेचा एकही सामना होणार नाही, हे वृत्त चुकीचे आहे.’’
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी सुधीर नाईक यांनी मंगळवारी एमआयजीच्या खेळपट्टीची पाहणी करून समाधान प्रकट केले, असे ते पुढे म्हणाले.