जागतिक तिरंदाजी स्पर्धा : भारताची दुहेरी ‘रौप्य’कमाई

महिलांमध्ये क्रमवारी फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या कोलंबियाने भारताविरुद्ध तब्बल १५ वेळा १० गुणांवर अचूक वेध साधला.

भारताच्या महिला आणि मिश्र दुहेरी संघांनी जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत दोन रौप्यपदकांची कमाई केली. दोन्ही संघांना अंतिम फेरीत कोलंबियाने पराभूत केले.

कंपाऊंड प्रकारातील मिश्र दुहेरीत अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी कोलंबियाच्या डॅनियल मुनोज आणि सारा लोपेझ या कोलंबियन जोडीकडून १५०-१५४ असा चार गुणांच्या फरकाने पराभव पत्करला. महिला सांघिक गटात सारा, अलेहान्द्रो ऊसक्वीनो आणि नोरा वाल्देझ यांचा समावेश असलेल्या कोलंबियाने सातव्या मानांकित भारतावर २२९-२२४ अशी मात केली. भारताच्या महिला संघात ज्योती, मुस्कान किरर आणि प्रिया गुर्जर यांचा समावेश होता.

महिलांमध्ये क्रमवारी फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या कोलंबियाने भारताविरुद्ध तब्बल १५ वेळा १० गुणांवर अचूक वेध साधला. पहिल्या फेरीनंतर दोन्ही संघांत ५८-५८ अशी बरोबरी होती. यानंतर भारताने आघाडी मिळवण्याची संधी गमावली. कोलंबियाने ही लढत पाच गुणांच्या फरकाने जिंकली.

मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत कोलंबियन जोडीने चांगल्या सुरुवातीनंतर तिसऱ्या फेरीत ४० पैकी ४० गुण मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. कोलंबियाने एकूण १६ प्रयत्नांत १० बाण अचूक १० गुणांवर मारले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World archery competition india double silver wins akp