विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : गनेमत-अंगडला सुवर्ण

डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर २० वर्षीय गनेमत आणि २५ वर्षीय अंगड जोडीने पात्रता स्पर्धेत सर्वाधिक १४१ गुणांची कमाई केली

अंगड विर सिंग बाजवा (डावीकडून) आणि गनेमत सेखाँ.

‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारतीय नेमबाजांचे वर्चस्व कायम राखताना मंगळवारी गनेमत सेखाँ आणि अंगड विर सिंग बाजवा जोडीने स्कीट मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक कमावले आहे.

डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर २० वर्षीय गनेमत आणि २५ वर्षीय अंगड जोडीने पात्रता स्पर्धेत सर्वाधिक १४१ गुणांची कमाई केली. मग जेतेपदावर नाव कोरताना कझाकस्तानच्या ओल्गा पॅनारिना आणि अ‍ॅलेक्झांडर येचशेन्को जोडीविरुद्ध ३३-२९ अशी सरशी साधली. गनेमत ही विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत स्कीट प्रकारामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तिने हा पराक्रम दाखवला असून, हे तिचे स्पर्धेतील तिसरे पदक आहे.

सुवर्णपदकाच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ६२व्या क्रमांकावर असलेल्या अंगडने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन केले. २० फैरींपैकी त्याचा एकमेव प्रयत्न अपयशी ठरला. पहिल्या टप्प्यातील २० फैरींनंतर भारत आणि कझाकस्तान या दोन्ही संघांनी १६-१६ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या टप्प्यात गनेमतने चारही फैरी यशस्वीरीत्या झाडल्या, तर अंगड एका प्रयत्नात अपयशी ठरला. परंतु ओल्गा-अ‍ॅलेक्झांडर प्रत्येकी दोन प्रयत्नांत अपयशी ठरल्याने भारताने २३-२० अशी आघाडी मिळवली. अखेरच्या चार फैरींमध्ये अंगडने आत्मविश्वासाने कामगिरी केली.

परिनाझ धलिवाल आणि मैराज अहमद खान या भारताच्या जोडीचे कांस्यपदक मात्र थोडक्यात निसटले. कतारच्या रीम ए. शारशानी आणि रशीद हमाद जोडीने ३२ गुणांसह कांस्यपदक मिळवले. भारतीय जोडीने ३१ गुण मिळवले होते. कतारच्या जोडीने अखेरच्या चार फैरींमध्ये उत्तम गुण मिळवले, तर धलिवालचा खेळ दडपणाखाली ढासळला.

पदकतालिका

क्र. देश सुवर्ण   रौप्य   कांस्य  एकूण

१.  भारत   ७  ४  ४  १५

२.  अमेरिका २  १  १  ४

३.  कझाकस्तान १  २  १  ४

४.   आयर्लंड    १  १  ०  २

५.  डेन्मार्क १  ०  ०  १

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: World cup shooting competition ganemat angad gold abn