पीटीआय, चँगवॉन : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंहने शनिवारी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले. २१ वर्षीय ऐश्वर्यने अंतिम लढतीत २०१८च्या युवा ऑलिम्पिक विजेत्या हंगेरीच्या झलान पेकलरला १६-१२ असे हरवले. कनिष्ठ विश्वविजेत्या ऐश्वर्यने पात्रता फेरीत ५९३ गुणांची कमाई केली होती. हे ऐश्वर्यचे दुसरे विश्वचषक सुवर्णपदक आहे. याआधी त्याने गेल्या वर्षी नवी दिल्लीमध्ये मिळवले होते. चैन सिंगला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मध्य प्रदेशच्या ऐश्वर्यने भारताच्या खात्यावर चौथ्या सुवर्णपदकाची भर घातली. पदकतालिकेत आघाडीवर असलेल्या भारताने चार सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण नऊ पदके आतापर्यंत कमावली आहेत. २०१९मधील विश्वचषक सुवर्णपदक विजेत्या मनू भाकरला महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत पदकाने हुलकावणी दिली. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. माजी विश्वचषक रौप्यपदक विजेत्या अंजूम मुदगिलने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकाराची अंतिम फेरी गाठली आहे. क्रमवारीच्या फेरीत तिने सहावा क्रमांक मिळवला.