कटक वनडेमध्ये इंग्लंडविरुद्ध आपल्या करिअरमधील सर्वोत्तम खेळी साकारणाऱया युवराज सिंग याने एक महत्त्वाचा खुलासा केला. कॅन्सरशी झगडताना क्रिकेट सोडण्याचा विचार मनात आला होता, असे युवराजने म्हटले. युवराजने कटक वनडेमध्ये १२७ चेंडूत १५० धावांची दमदार खेळी साकारून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘धाकड’ कमबॅक केले. भारतीय संघाने कटक सामना १५ धावांनी जिंकला. युवराजला सामनावीराच्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. सामन्यानंतरच्या पत्रकारपरिषदेत युवराज म्हणाला की, कॅन्सरवर मात केल्यानंतर पहिले दोन ते तीन वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. संघात मला स्थान मिळत नव्हते. मला फिटनेसवर खूप मेहनत करावी लागली. संघात निश्चित अशी जागा मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार देखील मनात आला होता. पण परिस्थितीपुढे हार मानने मला पटले नाही. वेळ नक्की बदलेल असा माझा विश्वास होता आणि विराट कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मी पुनरागमन करू शकलो. आता कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान माझ्यासमोर असणार आहे, असेही युवराज पुढे म्हणाला.

माझ्याबाबत कोण काय म्हणतं याचा मी विचार करत नाही. मी बातम्या पाहात नाही. इतकेच नाही तर मी टीव्ही देखील पाहणे सोडून दिले आहे. संघात पुनरागमनासाठी मी पूर्णपणे माझ्या खेळावर लक्ष दिले. मी आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खूप चांगला खेळाडू आहे हे दाखवून देण्यासाठी मी झटत राहिलो आणि यापुढेही खेळत राहिन, असे युवराजने सांगितले.

BLOG: पंजाब दा बब्बर शेर..

गेल्या तीन वर्षांपासून युवराजने एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला नव्हता. स्थानिक सामन्यांतील चांगल्या कामगिरीनंतर युवराजला विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघात खेळण्याची संधी मिळाली. युवराजने कटकमधील खेळी आपल्या करिअरमधील सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगत धोनीचेही कौतुक केले. संघाच्या नेतृत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने धोनी आता अधिक चांगली आणि खुलेपणाने फलंदाजी करू शकतो. यापुढील सामन्यांतही तो अशीच चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसेल, असा विश्वास असल्याचे युवराज म्हणाला.

भारतीय संघाने कटक वनडेमध्ये इंग्लंडवर १५ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. युवराजने १२७ चेंडूंमध्ये १५० धावांची खेळी साकारली. यात युवराजने तब्बल २१ चौकार आणि ३ खणखणीत षटकार ठोकले. युवराजला यावेळी धोनीने उत्तम साथ देत १३४ धावांची खेळी साकारली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी २५६ धावांची भागीदारी रचली. युवराज आणि धोनीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर विजयासाठी २८२ धावांचा डोंगर उभारता आला होता.