टी२० क्रिकेटच्या इतिहासात १९ सप्टेंबर हा एक खास दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी स्टुअर्ट ब्रॉडला युवराज सिंगने मारलेल्या त्या ६ षटकारला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या सामन्याचा व्हिडिओ युवराज आपल्या खास व्यक्तीसोबत पाहतानाचा आनंद घेत होता. त्याचा हा मुलासोबत पाहण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० विश्वचषकात डर्बनच्या मैदानावर युवराजने इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील सर्व ६ चेंडूत ६ षटकार ठोकले.

आफ्रिकेचा दिग्गज हर्षल गिब्सनंतर एका षटकात सहा षटकार मारणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसराच फलंदाज ठरला. २००७ साली आयसीसी टी२० विश्वचषकाचा पहिलाच हंगाम खेळला जात होता. हंगामातील २१ वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता.

हेही वाचा   :  “निकालपेक्षा संघाची योग्य निवड अधिक महत्वाची”, आशिष नेहराचा रोहितला मोलाचा सल्ला 

युवीने रचलेल्या या इतिहासाला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता १५ वर्षांनंतर युवीने एक खास ट्विट केले आहे. युवराजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखाल शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्वत: मारलेल्या ६ षटकारांचे हायलाइट्स पाहत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु असताना अचानक एंड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराज यांच्यात त्या षटकादरम्यान वाद झाला आणि त्याचा फटका स्टुअर्ट ब्रॉडला भोगावा लागला.

सोशल मीडियावरील व्हिडिओ

युवराजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या मुलासोबत त्या सामन्यातील सुंदर क्षणांचा आनंद घेत होता. युवीने पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘१५ वर्षांनंतर हे पाहण्यासाठी यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकला नसता.’ तो व्हिडिओ टीव्हीवर युवीचा मुलगा खूप लक्षपूर्वक पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर युवराज मुलाचा हात धरून षट्कार मारल्यानंतर जल्लोष करताना दिसत आहे. युवीने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम ही युवराज सिंगच्या नावावर आहे.