राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल क्वॉलिफायर २ सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा असून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या समान्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघांतील गोलंदाजांचा कस लागणार आहे. विशेषत: जो संघ पहिल्यांदा गोलंदाजी करेल त्या संघातील गोलंदाजांना जास्त प्रयत्न करावे लागतील. कारण, जर प्रतिस्पर्धी संघाला माफक धावसंख्येवर गुंडाळण्यात त्यांना यश आले तर त्यांच्या संघातील फलंदाजांवर कमी दबाब असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा गोलंदाजांवर जास्त असणार आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वानिंदू हसरंगा हे तर प्रमुख आकर्षण ठरतील.

राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वानिंदू हसरंगा हे आपापल्या संघातील मोक्याचे गोलंदाज आहेत. हे दोन्ही खेळाडू पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. आयपीएलच्या १५व्या हंगामात युझवेंद्र चहलने आतापर्यंत १५ सामने खेळून २६ बळी घेतले आहेत तर, वानिंगू हसरंगाने १५ सामने खेळून २५ बळी मिळवलेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये पर्पल कॅपसाठी जोरदार चुरस बघायला मिळणार आहे.

आजचा सामना युझवेंद्र चहलसाठी विशेष ठरू शकतो. युजवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासातील चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १२९ सामन्यात १६५ बळी मिळवलेले आहेत. आजच्या सामन्यात त्याने आणखी दोन बळी घेतले तर तो अमित मिश्राला मागे सोडेल. भारताचा माजी डावखुरा फिरकीपटू असलेल्या अमित मिश्राने आयपीएलमध्ये १५४ सामने खेळून १६६ बळी घेतलेले आहेत.

सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युझवेंद्र चहल मागील आयपीएल हंगामापर्यंत बंगळुरूचा सर्वात भरवशाचा गोलंदाज होता. मात्र, बंगळुरूच्या संघ मालकांनी त्याला यावर्षी रिटेल केलं नाही. त्यामुळे लिलावात सहभागी झालेल्या चहलला राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. राजस्थानच्या संघाकडून त्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वानिंदू हसरंगाबद्दल बोलायचे झाल्यास ऑगस्ट २०२१ मध्ये, आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी हसरंगाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात समावेश पहिल्यांदा करण्यात आला होता. तर, २०२२ च्या आयपीएल लिलावात हसरंगाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोठी किंमत देऊन विकत घेतले. मुळचा श्रीलंकन खेळाडू असलेल्या हसरंगाने आतापर्यंत आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे.