कारकिर्दीतील जेतेपदांचा दुष्काळ संपवत गेल्या वर्षी याच स्पर्धेद्वारे पहिलेवहिले जेतेपद कमावणाऱ्या अॅण्डी मरेने यंदाही जेतेपद पटकावण्याच्या दिशेने दिमाखात सुरुवात केली. मायकेल लोइड्राला नमवत मरेने अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे घरच्या मैदानावर खेळतानाच माजी विजेत्या व्हीनस विल्यम्सला दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या जि झेंगने व्हीनसवर ६-३, २-६, ७-६ (७-५) अशी मात केली.
महिलांमध्ये व्हीनसची अनपेक्षित हार तिसऱ्या दिवशीच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. २००० आणि २००१ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या व्हीनसला दुखापती आणि खराब फॉर्मने वेढले आहे. बुधवारी झालेल्या लढतीत चीनच्या जि झेंगने तिचे आव्हान तीन तासांच्या लढतीत संपुष्टात आणले. अमेरिकन खुल्या स्पर्धेत दोनदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या झेंगची दुसऱ्या फेरीत स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारोशी लढत होणार आहे. अन्य लढतींमध्ये पोलंडच्या तृतीय मानांकित अॅग्नीझेस्का रडवानस्काने स्पेनच्या मारिआ टेरेसा टोरो-फ्लोअरचा ६-०, ७-५ असा धुव्वा उडवला. चीनच्या पाचव्या मानांकित लि नाने स्वीडनच्या सोफिया अरविडसॉनवर ६-२, ६-२ अशी सहज मात केली.
धुवाधार पावसामुळे अॅण्डी मरेचा मुकाबला तब्बल चार तास उशिराने सुरू झाला. मात्र दीड तासात मरेने लॉइड्राचे आव्हान ६-२, ६-४, ६-३ असे संपुष्टात आणले. अन्य लढतींमध्ये अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रो आणि स्पेनच्या ग्युइलर्मो गार्सिआ-लोपेझ यांच्यात जबरदस्त मुकाबला रंगला. ही लढत ४ तास १३ मिनिटे रंगली आणि अखेर सहाव्या मानांकित डेल पोट्रोने ६-७ (५-७), ६-४, ७-६(९-७) असा विजय मिळवला.
सोमदेव दुसऱ्या फेरीत…
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या एकेरी प्रकारात भारताची एकमेव आशा असलेल्या सोमदेव देववर्मनने दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. स्लोव्हाकियाच्या ल्युकास लाकोवर ४-६, ६-१, ६-२, ४-६, ६-४ अशी मात करत सोमदेवने विजय साकारला.
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात सोमदेवने पहिला सेट गमावला. मात्र त्यानंतर दोन सेट नावावर करत सोमदेवने पुनरागमन केले. त्यानंतर ल्युकासने एक सेट जिंकला. मात्र अखेरच्या गेममध्ये सोमदेवने सरशी साधली. कमीत कमी चुका करत तसेच नेटजवळ सुरेख खेळ करत सोमदेवने विजयी सलामी दिली.