राफेल बेनिटेझ यांच्या हकालपट्टीनंतर रिअल माद्रिद क्लबच्या प्रशिक्षकपदावर विराजमान झालेल्या झिनेदीन झिदान यांना पदार्पणाच्या सामन्यात विजयी भेट मिळाली. फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू झिदानच्या मार्गदर्शनाखाली ला लीगा फुटबॉल स्पध्रेत खेळताना माद्रिदने गॅरेथ बेलच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर दुबळ्या डेपोर्टीव्हो ला कोरूना क्लबचा ५-० असा धुव्वा उडवला. करिम बेन्झेमाने दोन गोल करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
या विजयामुळे माद्रिद (४०) गुणतालिकेत अव्वल असलेल्या बार्सिलोना क्लबपेक्षा (४२) दोन गुणांनीच पिछाडीवर राहिला आहे. बेनिटेझ यांच्या तडकाफडकी हकालपट्टीमुळे बेल नाराज झाला होता, परंतु त्याचा परिणाम त्याने कामगिरीवर होऊ दिला नाही.
१५व्या मिनिटाला बेन्झेमाने माद्रिदचे गोलखाते उघडले. त्यापाठोपाठ बेलने २२व्या मिनिटाला गोल करून मध्यंतरापर्यंत माद्रिदला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर ४९व्या व ६३व्या मिनिटाला बेलने गोल करून हॅट्ट्रिक साजरी केली. पहिल्या गोलनंतर ६३व्या मिनिटाला बेलने पुन्हा अप्रतिम हेडर लगावला. भरपाई वेळेत बेन्झेमाने आणखी एक गोल करत माद्रिदच्या
५-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.