जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद पहिल्यांदाच आमनेसामने येणार असल्यामुळे या सामन्याविषयी उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आनंदने झुरिक बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धेत कार्लसनविरुद्धचा पाचवा डाव सहजपणे बरोबरीत सोडवला.
क्लासिकल प्रकारातील पाच डाव संपले असून आता जलद प्रकाराला सुरुवात होईल. पहिल्या पाच डावांत आनंदने एक विजय, दोन बरोबरी आणि दोन पराभवांसह चार गुण मिळवत संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले आहे. आता जलद प्रकारात आनंदला कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. कार्लसनचा प्रतिस्पर्धी लेव्हॉन अरोनियनला इटलीच्या फॅबिआनो कारुआनाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कार्लसनने आठ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले आहे. अरोनियन सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारुआनाने पाच गुणांनिशी तिसरे स्थान मिळवले आहे. आनंद आणि अमेरिकेचा हिकारू नाकामुरा संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत. जलद प्रकारातील विजय मिळवणाऱ्या खेळाडूंना एक गुण मिळणार असल्यामुळे जेतेपदासाठी कार्लसनचे पारजे जड आहे.
कार्लसनविरुद्ध आनंदने सावध सुरुवात केली. बर्लिन बचाव पद्धतीचा अवलंब करत आनंदने ठरावीक अंतराने एकमेकांचे मोहरे टिपण्यावर भर दिला. समान मोहरे शिल्लक असल्यामुळे कुणालाही जिंकण्याची संधी नव्हती. ४०व्या चालीनंतर सामना बरोबरीत सोडवण्याचे दोघांनीही मान्य केले.