एकदिवसीय क्रिकेटसाठी हे वर्ष वास्तवाचे दर्शन देणार होते. तुमचे नाणे खणखणीत असेल तरच वाजेल, हे या वर्षांने दाखवून दिले. सामना हा दैवापेक्षा तुमच्या गुणवत्तेच्या जोरावरच जिंकता येतो हे या वर्षांचे वैशिष्टय़ ठरले. ऑस्ट्रेलियाने पटकावलेले विश्वविजेतेपद आणि एबी डी’व्हिलियर्सच्या नावाचा गजर क्रिकेट विश्वामध्ये चांगलाच निनादला. भारतासाठी हे वर्ष जास्त फलदायी ठरले नाही. विश्वचषकातली कामगिरी थोडीशी सुखावणारी असली तरी अन्य मालिकांमध्ये भारताचा वरचष्मा पाहायला मिळाला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षांत बरेच बदल एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील, अशी आशा आहे.

एबीडी.. एबीडी..

यंदाचे वर्ष गाजवले ते एबी डी’व्हिलियर्स नामक अवलियाने. वर्षांच्या पहिल्याच मालिकेत त्याने सर्वात जलद शतक ठोकण्याचा विश्वविक्रम रचला. ३१ चेंडूंमधले त्याचे हे शतक डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. तुमच्याकडे अद्भुत गुणवत्ता असली तर प्रतिस्पर्धी आणि खेळपट्टी कशीही असो, तुमची कामगिरी अव्वल दर्जाचीच होते, हे डी’व्हिलियर्सने या वेळी दाखवून दिले. विश्वचषकातही त्याने जलद दीडशतक लगावले. भारताविरुद्धच्या वानखेडेवरील सामन्यात त्याची फलंदाजी अविस्मरणीय अशीच होती. कोणताही चेंडू सीमापार धाडण्याची कुवत, फटके बनवण्याची किमया त्याच्याकडून पाहायला मिळाली. शांत डोक्याने गोलंदाजांवर आक्रमण करणाऱ्या  डी’व्हिलियर्सला जगभरातील सर्वच मैदानात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश सरस

यंदाच्या वर्षांत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन संघांनी दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा संघ या वर्षांत खरा  अव्वल ठरला. प्रत्येक प्रतिस्पध्र्याला त्यांनी धूळ चारली. संघातील प्रत्येक खेळाडू व्यावसायिकपणे खेळल्यावर निकाल कसा लागू शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ ऑस्ट्रेलियाने दाखवला. मायकेल क्लार्कने विश्वचषकापर्यंत आणि त्यानंतर स्टिव्हन स्मिथने ऑस्ट्रेलियाचा ध्वज उंचावत नेला. बांगलादेशचेही कौतुक करावेच लागेल. कारण या वर्षांत १८ पैकी १५ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला. भारतासह अन्य नावलौकिक मिळवलेल्या संघांनाही त्यांनी पराभूत केले. या वर्षांत सर्वाधिक सामने (३१) न्यूझीलंडचा संघ खेळला, त्यामध्ये त्यांनी २१ सामने जिंकले. त्यांची कामगिरी चांगली दिसत असली तरी मोक्याच्या क्षणी त्यांना विजय मिळवता आले नाहीत.

भारत निष्प्रभ

या वर्षांत भारताला झिम्बाब्वेविरुद्धची मालिका वगळता एकाही मालिकेत यश मिळवता आले नाही. यश ज्याच्या मागे धावायचे तो महेंद्रसिंग धोनी या वर्षांत पुरता अपयशी ठरताना दिसला. त्याला या वर्षांत भारताला एकही मालिका जिंकून देता आली नाही. ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत तर भारताची लक्तरे निघाली. विजयाचे तोंड पाहणे भारतासाठी दुर्मीळ होते. पण त्यानंतर संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी संघात आत्मविश्वास फुंकला आणि भारत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. पण त्यानंतर पुन्हा भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत अडकला. बांगलादेशने भारताला आमंत्रित केले आणि २-१ असा पराभव करत पाठवणी केली. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला आणि २-१ अशी मालिका जिंकून आला. परंतु दक्षिण आफ्रिकेने भारताला मायदेशात येऊन एकदिवसीय मालिकेत पराभूत केले. या वर्षांतील महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारताची कामगिरी पाहता पुढच्या वर्षी तो कर्णधारपदी कायम राहण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते.

ऑस्ट्रेलियाला पाचव्यांदा विश्वविजेतेपद

यंदाच्या विश्वचषकात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाचा संभाव्य दावेदार वाटत होता आणि त्यांनी दमदार कामगिरी करत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घालण्याची किमया साधली. कर्णधार मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिन्ही आघाडय़ांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. भारताला उपांत्य आणि न्यूझीलंडला अंतिम फेरीत पराभूत करून त्यांनी विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या वेळी २२ बळी मिळवीत साऱ्यांचे लक्ष वेधले, त्यालाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.  विश्वचषकापूर्वीच्या एकदिवसीय मालिकेत भारताची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली होती. पण त्यांनी विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून या वेळी पहिल्यांदा एवढी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने त्यांना सहज पराभूत केले. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने सलग चार शतके लगावत विश्वचषकात एक अनोखा विश्वविक्रम केला.

prasad.lad@expressindia.com