सिंधू, ज्वाला-अश्विनी यांना पराभवाचा धक्का

भारताची फुलराणी सायना नेहवालने जपान सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र पी.व्ही. सिंधू, ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा यांना अनपेक्षितपणे सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी विजयी आगेकूच केली.
द्वितीय मानांकित सायनाने थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुनगपनवर २१-१४, २२-२० असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सायनाचा मुकाबला मिनात्सु मितानीशी होणार आहे. जपानच्या मिसाकी मातुस्मो आणि अयाका ताकाहाशी जोडीने प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डी जोडीचा २१-६, २१-१७ असा धुव्वा उडवला. जपानच्या मिनात्सु मितानीने पी.व्ही. सिंधूवर २१-१३, १७-२१, २१-११ अशी मात केली. चीनच्या झाओ युनलेई आणि झोंग क्विझीन जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीला २२-२०, १८-२१, २१-१३ असे नमवले.
सातव्या मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सलेनने अजय जयरामवर २१-१०, २१-१० असा सहज विजय मिळवला. जपानच्या ताकुमा युइडाने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे कश्यपला विजयी घोषित करण्यात आले. कोरियाच्या ली डोंग केयुनने बी. साईप्रणीतला २३-२१, २१-१० असे नमवले. तृतीय मानांकित किदम्बी श्रीकांतने आर्यलडच्या स्कॉट इव्हान्सला २१-१८, २१-१५ असे नमवले.
प्रणॉयने हाँगकाँगच्या वोंग विंग की व्हिन्सेंटवर २३-२१, २२-२० अशी मात केली. दुसऱ्या फेरीत श्रीकांत आणि कश्यप समोरासमोर असणार आहेत.