कर्नाटकच्या पी.एन.प्रकाशने ‘गन फॉर ग्लोरी’ अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. महिलांमध्ये हा मान उत्तराखंडच्या प्रेरणा गुप्ताला मिळाला.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रकाशने ५७६ गुणांची कमाई केली. रेल्वेचा जितेंद्र विभुतेने ५७५ गुणांसह रौप्यपदक मिळवले. पंजाबच्या अक्षय जैनला कांस्यपदक मिळाले. त्याने ५७४ गुणांची नोंद केली. शेवटपर्यंत ही स्पर्धा रंगतदार झाली.
महिलांमध्ये प्रेरणाने ३७७ गुण मिळवत विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या रश्मी धावडेने रुपेरी कामगिरी केली. तिने ३७६ गुण मिळविले. तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. सोनाली परेराला कांस्यपदक मिळाले. तिने ३७१ गुणांची कमाई केली.
या स्पर्धेबरोबर सुरू असलेल्या चॅलेंजर स्पर्धेत भूपेंद्रसिंग राठोड व जयवर्धन सिंग यांनी १० मीटर पिस्तूल विभागात उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. राठोडने रेल्वेचा खेळाडू विपिन राणावर १०-८ अशी मात केली. मध्य प्रदेशच्या जयवर्धन सिंगने जितेंद्र विभुतेला १०-९ अशा केवळ एक गुणाने हरविले.