-डॉ. अविनाश भोंडवे

आपले पोट म्हणजे एक जादूचा पेटारा असतो. त्यामध्ये अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठे आतडे, यकृत, प्लीहा, पित्ताशय, स्वादुपिंड, अपेंडिक्स, मूत्रपिंडे, मूत्रनलिका, मूत्राशय आणि स्त्रियांबाबत गर्भाशय, बीजांड कोश, बीजनलिका असे असंख्य अवयव असतात. या अवयवांच्या नित्याच्या क्रियेत बिघाड झाला किंवा त्यांना जंतुसंसर्ग किंवा विषाणू बाधा झाली तर पोट दुखू लागते. साहजिकच पोटात दुखल्यावर रुग्ण जेवढा चिंतेत असतो, तेवढेच त्याची चिकित्सा करणारे डॉक्टरही साशंक असतात.

पोट दुखण्याच्या कारणांमध्ये सर्वसामान्यपणे अपेंडिक्सच्या दुखण्याबद्दल बहुतेकांच्या मनात खूप भीती असते. कारण वेळेवर उपचार न केल्यास खूप गंभीर स्वरूप धारण करणारा हा आजार असतो.

आपल्या तोंडापासून सुरू होणारी पचनसंस्था, अन्ननलिका. जठर, लहान आतडे, मोठे आतडे एखाद्या नलिकेसारखी असते. पोटाच्या पोकळीत लहान आतडे संपून मोठय़ा आतडय़ाची सुरुवात होते, तिथे मोठय़ा आतडय़ाचा सुरुवातीचा भाग एखाद्या पिशवीसारखा फुगीर असतो. त्याला ‘सीकम’ म्हणतात. या सीकमला करंगळीसारखे अपेंडिक्स जोडलेले असते. ते आतून पोकळ असते. पण त्याचे दुसरे टोक बंद असते. अपेंडिक्सला जेव्हा जंतुसंसर्गाने सूज येते त्याला ‘अपेंडिसायटिस’ म्हणतात.

लक्षणे-

* बेंबीच्या खालील भागात असलेल्या पोटाच्या उजव्या बाजूस अचानक खूप कळा येऊ  लागतात. या वेदनांना प्रथम बेंबीपाशी सुरुवात होते. नंतर त्या खाली उजव्या बाजूस सरकतात.  शरीराची थोडीशी हालचाल झाली किंवा खोकला आला तर या वेदना वाढतात. मळमळ होऊन उलटय़ा होऊ  लागतात. अन्नावर वासना राहत नाही. हळूहळू कणकण येऊन ताप भरू लागतो. सुरुवातीला काही रुग्णांना जुलाब होतात आणि नंतर शौचाला होत नाही. पोटात गुबारा धरून पोट फुगू लागते.

* अपेंडिक्स दुखण्याची जागा वयोमानाप्रमाणे बदलू शकते. गर्भवती स्त्रियांना हा त्रास झाल्यास ही जागा बेंबीच्या वरील भागातही असू शकते.

कारणे

* आहारातल्या अन्नाचा एखादा भाग अपेंडिक्सच्या पोकळीत शिरतो. अपेंडिक्सचे पुढील तोंड बंद असल्याने ते अन्नकण पुढे सरकत नाहीत. अपेंडिक्सच्या पोकळीत ते कुजतात आणि अपेंडिक्सला सूज येऊन वेदना सुरू होतात.

* शौचाला रोज साफ न झाल्यास मोठय़ा आतडय़ातील अन्न पुढे सरकायला थोडा जास्त वेळ घेते. आतडय़ामध्ये मैलाचे खडे झाल्यानेही हा त्रास उद्भवू शकतो.

* आहारात तंतुमय पदार्थ नित्यनेमाने कमी असल्यास तसेच प्रथिनयुक्त पदार्थ, जंकफूड यांचा समावेश जास्त प्रमाणात आणि नेमाने असल्यास हा त्रास होतो.

* अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची शारीरिक हालचाल कमी असल्याने आतडय़ाची हालचाल मंदावते आणि अन्नकण अपेंडिक्समध्ये शिरू शकतात.

* पोटात जंत असल्यास ते अपेंडिक्समध्ये शिरून अपेंडिसायटिस होऊ  शकते.

* अन्नामधून गेलेल्या जंतूंमुळे अपेंडिक्सचा विकार उद्भवू शकतो.

उपचार

आजार सौम्य प्रमाणात असेल तर औषधांद्वारे बरे करता येते. यात वेदनाशामक आणि प्रतीजैविके वापरून तो बरा होऊ  शकतो. पण अपेंडिक्सचा त्रास सुरू झाल्यावर रुग्णाचे त्वरित निदान करून शस्त्रक्रिया करावी लागते. ही या पोटाच्या खालच्या भागात छोटा छेद घेऊन किंवा लॅप्रोस्कोपिक दुर्बिणीद्वारे पोटाला छेद देऊन केली जाते. याचे दुष्परिणाम अत्यल्प असतात. अपेंडिक्सच्या भोवती गोळा जमला असेल तर एक दीड महिने थांबून मगच शस्त्रक्रिया करावी.