18 January 2019

News Flash

एअर बॅग्स एबीएस, सक्ती पण..

सेकंड टॉप मॉडेलमध्ये सुरक्षिततेचे फीचर ऑप्शनल देण्यात आले होते.

केंद्र सरकारने दुचाकी व चारचाकी (पॅसेंजर कार्स) एबीएस वा सीबीएस आणि एबीएस व एअर बॅग्स बसविण्याची सक्ती नवीन वाहनांसोबत जुन्या वाहनांनाही आहे का? सुरक्षेच्या दृष्टीने मागास असलेल्या देशात हे पाऊल तसे स्वागतार्हच; परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करायची झाल्यास जुन्या वाहनचालकांवर किंवा ही प्रणाली प्रमाणित करण्यासाठी कंपन्या किंवा तत्सम व्यवस्थेवर होणारे परिणाम यांचा घेतलेला आढावा.

कोणत्याही प्रकारचे स्वयंचलित वाहन असो मग ते दुचाकी का चारचाकी का अवजड; जागतिक पातळीवर सुरक्षिततेचे निकष आणि भारतामधील निकष यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. दाखलाच द्यायचा झाल्यास जागतिक पातळीवर कारला एअर बॅग्स (एक दोन नव्हे, चार) गेल्या अनेक वर्षांपासून सक्तीच्या आहेत. आपल्याकडे वाढती स्पर्धा लक्षात घेऊन काही कंपन्यांनी कारच्या विशिष्ट मॉडेलला वा विशिष्ट सेगमेंटमधील कारना एअर बॅग्स देण्यास सुरुवात केली. पण, एंट्री लेव्हल सेगमेंटमधील कारमध्ये मात्र टॉप एंडच्या कारला एअर बॅग्स या पर्याय (ऑप्शनल) म्हणून होत्या. सेकंड टॉप मॉडेलमध्ये सुरक्षिततेचे फीचर ऑप्शनल देण्यात आले होते. पण, वास्तविक पाहता केंद्र सरकारने ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅन आखतानाच २०१० पासूनच एअर बॅग्स, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) ही सुरक्षिततेची फीचर सर्वप्रकारच्या कारना सक्तीची करणे आवश्यक होते. पण, उशिरा का होईना अखेर आता सरकारने ते सक्तीचे केले आहे. यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढणार आहे. अर्थात, यामुळे कार, दुचाकींच्या किमतीत वाढ होणार असली तरी ते हिताचेच आहे. याच जोडीला कारलाही अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) सक्तीची केली आहे आणि ती स्वागतार्ह आहे. कारण, डिस्कब्रेकला एबीएस असल्यावर ब्रेकची कार्यक्षमता वाढते यात शंका नाही. कारप्रमाणेच १२५ सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींनाही अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) वा कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम (सीबीएस) सक्तीची करण्यात आली आहे. यामध्ये एप्रिल २०१८ पासून उत्पादित होणाऱ्या वाहनांना ती लागू असणार आहे. अचानक ब्रेक दाबावा लागल्याने दुचाकी घसरून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नव्या ब्रेकिंग प्रणालीमुळे तो काही अंशी कमी होण्यास मदत होणार असली तरी चालविताना खबरदारी ही घ्यावीच लागणार आहे. दुचाकीची कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम ही तुलनेने स्वस्त आहे. पण, एबीएसप्रणाली महाग आहे. यामुळे दुचाकीच्या किमतीवर परिणाम होणार आहे, हे नक्की. अर्थात, एक लाख रुपयांची मोटरसायकल घेणाऱ्या व्यक्तीला नव्या ब्रेकिंग सिस्टिमचे मॉडेल घेताना बजेट वाढले, असे म्हणण्याची गरज नाही. वाहनांच्या सुरक्षितेच्या नियमांत बदल होण्यापूर्वी काही कंपन्यांकडून कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम, एबीएस असणारी मॉडेल लाँच करण्यात आली आहेत. मात्र, एबीएस असणारी मॉडेल हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असून, ती प्रीमियम सेगमेंटमधीलच आहेत. पण, आता सर्वच कंपन्यांना ब्रेकिंगच्या या नव्या निकषाचा समावेश आपल्या वाहनांत करावा लागणार आहे.

कंपन्यांकडून प्रतिसाद नाही

नव्या वाहनांना एबीएस वा सीबीएस व कारसाठी असणारी एबीएस व एअर बॅग्स बंधनकारक आहे. पण, जुन्हा वाहनांना हे बसवून घेणेही बंधनकारक केल्यास दुचाकी वा कारमध्ये मेकॅनिकल बदल करावे लागणार आहेत आणि संबंधित प्रणाली वाहनांमध्ये बसविण्यासाठी मेकॅनिकल व टेक्नॉलॉजीदृष्टय़ा सक्षम मनुष्यबळाची आवश्यकता आहे. पण, जुन्या वाहनांनी कोणाकडून संबंधित गोष्टी बसवून घ्यायच्या आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. दुचाकी व चारचाकी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी ई-मेलद्वारे यासंदर्भात संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून यावर उत्तर मिळाले नाही. त्यामुळेच जुन्या दुचाकींसाठी एबीएस वा सीबीएस कोठे बसवून मिळणार, ही प्रणाली बसवायची झाल्यास दुचाकीमध्ये कोणते बदल करावे लागतील, किंमत किती, प्रमाणित कोण करणार आदी प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. कारमध्ये एबीएस व एअर बॅग्स बसविण्यासाठी खूप मोठे बदल करावे लागणार आहेत. तसेच, वितरकांच्या पातळीवर हे काम कितपत होऊ  शकते, यावर वाहन तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

अक्षय्यमुहूर्ताला सावध व्हा!

नव्या निकषाची पूर्ती एक एप्रिल २०१८ पासून उत्पादित होणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी होणार आहे. पण, सध्या बाजारपेठेत फक्त काही निवडक वाहनांमध्ये एबीएस वा सीबीएस व कारसाठी असणारी एबीएस व एअर बॅग्स देण्यात आली आहेत. पण, अक्षय्यतृतीयेला वाहन खरेदी करताना यामध्ये ही वैशिष्टय़े आहेत ना, याची खात्री करणे आवश्यक आहे. कारण, हे वैशिष्ट नसल्यास ती पुन्हा बसविण्याचा मोठा खर्च करावा लागणार आहे. पूर्वीची इन्व्हेंटरी (१ एप्रिल २०१८) रिकामी करण्यासाठी कंपन्यांकडून डिस्काउंटही दिले जाऊ  शकते. पण, ते कितपत फायद्याचे आहे, याचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण, १ एप्रिल २०१९ पर्यंत सर्व दुचाकी (एबीएस वा सीबीएस) व कारला एबीएस व एअर बॅग्स लावणे बंधनकारक आहे. वाहन खरेदी करताना त्याचे उत्पादन वर्ष जाणून घेणे आवश्यक आहे. वाहनावर त्याचा स्पष्ट उल्लेख असतो.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

जुन्या कारमध्ये एबीएस व एअर बॅग्स रेट्रोफिट करावयाची झाल्यास अनेक मोठे बदल करावे लागणार आहेत. तसेच, हे बदल गॅरेजमध्ये करणे शक्य नाही. प्रत्येक मॉडेलसाठी एअर बॅग व स्टेअरिंग असेंब्ली वेगळी करावी लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड मोडय़ूल बसवावे लागणार असून, सध्याचा डॅशबोर्ड बदलावा लागणार आहे. कंपन्यांचे सव्‍‌र्हिसिंग सेंटर आधुनिक (तंत्रज्ञानयुक्त व कुशल मनुष्यबळ) असावे लागणार आहे. हे सर्व असल्यासच एबीएस व एअर बॅग्सचे रेट्रोफिटिंग करता येऊ  शकेल. कारण, एअर बॅग्स एका विशिष्ट इम्पॅक्टला ओपन होतात आणि त्याची असेंबली नीट न झाल्यास ती यंत्रणाच कार्यान्वित होण्यास अडचण येऊ  शकते. त्यामुळे एअर बॅग्स व एबीएस असेंब्ली ही ओईएम्सकडून (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स) वा कार कंपन्यांकडून बसवून घेणे योग्य ठरणार आहे. यातील ओईएम्सकडून ते होईल का नाही, हे सांगता येत नाही. कारण, अशा कंपन्या ग्राहकांना थेट सेवा देत नाही. त्या वाहन उत्पादक कंपन्यांना पुरवठा करीत असतात, असे वाहनतज्ज्ञ विनायक भिडे यांनी सांगितले.

जुन्या दुचाकी (एबीएस वा सीबीएस) व चारचाकीमध्ये (एबीएस व एअर बॅग्स) बसविण्यासाठी निश्चित तांत्रिक व मेकॅनिकल बदल करावे लागणार आहेत. हे खूप जिकिरीचे काम आहे. त्यामुळेच अशी यंत्रणा ही कंपन्यांच्या पातळीवर वा वितरकांमार्फत होऊ  शकते. तसेच, दुचाकीला एबीएस केवळ एका चाकाला बसवून चालणार नाही, तर दोन्ही चाकांना ती असल्यास ब्रेकचा प्रभावी वापर होऊ  शकतो, असे निरीक्षण अनेक वाहन तज्ज्ञांनी नोंदविले.

First Published on April 14, 2018 12:34 am

Web Title: abs airbag system