नंदिता पाटकर, अभिनेत्री

आपल्या दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणते, सुरुवातीच्या काळात घरी राहणे खूप जड गेले, कारण काम, भटकंती यानिमित्ताने प्रवास खूप होत असल्याने घरी राहण्याचा योग कमी येतो. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस घरी राहून करायचे काय हा माझ्यासमोरील मोठा प्रश्न होता. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे घरी राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ही गोष्ट स्वीकारून दोन महिन्यांत विविध गोष्टींची यादी तयार केली. त्याप्रमाणे रोज एक नवीन गोष्ट करते आहे. या कालावधीत मी स्वत:़ला वेळ द्यायचे ठरवले आहे.

माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी व्यायामाने होते. योगासने, क्रिया, प्राणायाम हे प्रकार केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते. दिवसभर काम करण्यास प्रसन्न वाटते. व्यायामाबरोबर सध्या मी मंडाला चित्रकलेचेही धडे घेते आहे. ‘मंडाला’ या संस्कृत शब्दाचा अर्थ वर्तुळ असा असून ही कला जगभरात लोकप्रिय आहे. मंडाला चित्रकलेमध्ये वर्तुळात एकच नक्षी काढली जाते. यामुळे माझी एकाग्रता वाढीस लागली आणि एकाच जागी बसून काम करण्याची सवय लागली, असेही तिने सांगितले.

सध्या मोबाइल हा आपला देव झाला आहे. घरी असताना नंदिताने मोबाइलचा वापर कमी करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे तिचा दिवसातील बराचसा वेळ लेखन, वाचन आणि स्वयंपाक करण्यात जातो. यूटय़ूबवरील व्हिडीओ पाहून घरबसल्या मी के क आणि चिकनचे विविध प्रकार करायला शिक ते आहे. अनेक वर्षांपासून गझल, शायरी ऐक त असल्याने उर्दू भाषा शिकायची इच्छा होती. सध्या विनायक राजवाडे सरांकडे मी ऑनलाइन उर्दू भाषा शिकते आहे. ही भाषा आत्मसात करण्यासाठी ‘जश्न – ए – रेख्ता’, ‘सुखन’ यांसारखे कार्यक्रम पाहात असून याच्याशी संबंधित विविध पुस्तकांचे वाचनही करते आहे. या दोन महिन्यांत मी ओशो लिखित ‘अनलिशिंग क्रिएटिव्हिीटी’, रॉबिन शर्माचे ‘द मॉंक हू सोल्ड द फेरारी’, एलिझाबेझ गिल्बर्टचे ‘इट प्रे लव्ह’ ही पुस्तके वाचली. काही वाचकांना पुस्तके वाचण्यापेक्षा गोष्टी ऐकायला जास्त आवडत असल्याने मी कथाकथनही सुरू केले आहे. त्यात एक कथा निवडून ती वाचून दाखवते. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तिने स्पष्ट केले.

मागच्या महिन्यात इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दर्जेदार अभिनेत्यांचे अचानक झालेले निधन सर्वानाच चटका लावून गेले. इरफान खान हा माझा आवडता अभिनेता होता. या निमित्ताने मी पुन्हा एकदा इरफानचे आधीचे चित्रपट, व्हिडीओ आणि मुलाखती पाहिल्या, लेख वाचले. सध्या अनेक कलाकार विविध माध्यमांतून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. नुकत्याच एका पर्यटन क्षेत्रातील कंपनीने माझी मुलाखत घेतली. त्यात माझे पर्यटनाचे अनुभव सांगितले. टाळेबंदीनंतर मला मेघालय, लेह – लडाख येथे एकटीने भटकायचे असल्याने त्याचेही नियोजन करते आहे, अशी माहितीही तिने दिली.

संकलन – मानसी जोशी