आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अनेक औषधी वनस्पती कुंडीत सहज वाढवता येतात. आरोग्यविषयक लहान-मोठय़ा तक्रारींसाठी दवाखाना गाठण्याऐवजी या घरगुती औषधांचा वापर करता येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या औषधांचे काही दुष्परिणामही होत नाहीत.

कोरफड

आयुर्वेदात ‘कुमारी’ असे नाव असलेली ही वनस्पती टांगून ठेवली तरी जगते व वाढते. तिच्या पानांमधील बोळ किंवा गर वापरून आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपचार केले जातात. पाण्याची कमी गरज असणारी कोरफड वाळूमिश्रित मातीत लावावी, पाणी साठून राहिल्यास की मरते. डोळे आल्यास, आग होत असल्यास, भाजल्यास कोरफडीचा गर लावतात. त्याने दाह कमी होतो. खोकला, अपचन या विकारांत कोरफडीचे पान किंचित गरम करून, गरामध्ये थोडेसे सैंधव व हळद घालून घेतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारून आतडय़ांची क्षमता वाढते, शौचास साफ होते, शुद्ध रक्त तयार होते. तापात फार दाह व जीभ पांढरी असल्यास कोरफड वापरतात.