राजेंद्र श्रीकृष्ण भट

अडुळसा हे छान दिसणारे झाड उपलब्ध जागा आणि मातीप्रमाणे वाढते. फांद्यांना बोटासारख्या गाठी असतात. हिरवा आणि लाल अडुळसा असे दोन प्रकार आहेत. जास्त, म्हणजे साधारण ३०० मिमी पावसाच्या प्रदेशात लाल अडुळसा आढळतो. पानांची चव कडू असते.

याचा उपयोग मुख्यत्वे कफ कमी करण्यासाठी होतो. अडुळशाच्या पानांचा उपयोग औषधाप्रमाणेच खत म्हणूनही होतो. शिंपी पक्षी याची दोन पाने शिवून घरटे बांधतात. अडुळशाच्या पांढऱ्या फुलांच्या तळाशी मध असतो. त्यामुळे मधमाशांना या झाडाचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होतो. संस्कृतमध्ये याला ‘वासा’ म्हणून संबोधतात. बाजारात मिळणारे वासा सिरप खोकल्यावर अतिशय गुणकारी असते.

अडुळशाची लागवड फांदीपासून करतात. याचे कोवळे शेंडे लवकर रुजतात. लावताना पाने देठापासून कापावीत. जी फांदी लावायची आहे, तिला किमान दोन गाठी असणे आवश्यक आहे. एक गाठ मातीत आणि दुसरी मातीच्या वर राहील, अशा पद्धतीने फांदी लावावी. मातीतील गाठीतून मुळे आणि वरील गाठीतून कोंब फुटतात. हवेत आद्र्रता असताना म्हणजे जून-जुलैमध्ये छाट कलम जास्त चांगले रुजते.

या वनस्पतीला कीड आणि रोग जवळजवळ होतच नाहीत. फक्त पाने कुरतडणारे कीटक काही वेळा रात्री पाने कुरतडतात. अडुळसा जास्त वाढल्यास याची पाने आणि काडय़ा कापून बारीक करून कुंडीत मातीवर अच्छादन म्हणून वापरावे. त्यातील कडुपणामुळे मातीतील कीड नियंत्रित राहते आणि पानांचे खतात रूपांतर होते.