वैभव भाकरे

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मोटारचालकांना चांगलाच घाम फुटायला लागला आहे. महिनाभरात पेट्रोल, डिझेलवर होणाऱ्या खर्चात एकदम वाढ झाली आहे. गेल्या दहा- बारा वर्षांमध्ये सीएनजीचा परवडणारा पर्याय पुढे आला आहे. गाडीमध्ये सीएनजी किट बसवून घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी गाडीत सीएनजी बसवावे का एलपीजी याबाबत मतभेद दिसून येतात. काहींकडून खिशाला परवडणारे म्हणून सीएनजीचे कौतुक केले जाते. तर काही लोक पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे गाडीच्या क्षमतेवर येणाऱ्या मर्यादांबाबत साशंक असतात. त्यामुळे गाडीत सीएनजी बसवताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

पेट्रोल आणि डिझेलसाठी आता सीएनजी आणि एलपीजी अशे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी इंजिनवरील परिणाम आणि बचतीकडे पाहता सीएनजीचा पर्याय अधिक फायदेशीर म्हणून समोर येतो. सीएनजी किट गाडीत बसवण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहे. पहिला मुद्दा आहे सुरक्षेचा. एलपीजीच्या तुलनेत सीएनजी सुरक्षित ठरते.  सीएनजीचे इग्निशन तापमान जास्त असल्यामुळे ते पटकन पेट घेत नाही. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे सीएनजी हा इंधनप्रकार केवळ स्वस्तच नसून स्वच्छ आणि सुरक्षित असून इतर इंधनप्रकाराच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे.

तुमच्या पेट्रोल गाडीत सीएनजी किट बसवल्यावर तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधन प्रकारांचा वापर करून गाडी चालवू शकता. सर्वच मोटारी या सीएनजीमध्ये बदल करण्यात अनुरूप असतातच असे नाही. केवळ राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या नोंदणी प्राधिकरणाच्या ‘सीएनजी मंजूर’ यादीत समाविष्ट असलेली पेट्रोल मोटार सीएनजी टॅंक लावण्यासाठी पात्र असतात.

सीएनजी लावल्यामुळे इंधनाची मोठय़ा प्रमाणात बचत होते. पेट्रोलची मुंबईत सध्या किंमत ८९.६० रुपये एवढी आहे. एक स्मॉल सेगमेंट कार एक लिटर पेट्रोलमध्ये जवळपास १६ किमीचा अ‍ॅवरेज देते. म्हणजे एक किमीचा ५.६ रुपयांचा खर्च येतो. सीएनजीवर हीच गाडी जवळपास २५ किमीचा अ‍ॅवरेज देते. सीएनजीची किंमत मुंबईतही ४४.२२ रुपये इतकी आहे. म्हणजेच एका किमीचा तुम्हाला केवळ १.७८ रुपयांचा खर्च येतो. मोठय़ा गाडय़ा ज्या पेट्रोलवर ११ ते १२ किमीचा अ‍ॅवरेज देतात त्यामध्ये सीएनजी लावल्यास अधिक फायदा होतो. बाजारात सध्या सिक्वेन्शिअल सीएनजी किट उपलब्ध आहेत. सिक्वेन्शिअल सीएनजी किटची किंमत ३५ हजारांपासून सुरू होते. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे तुमचा इंधनावरील खर्च जवळपास निम्मा होऊन जातो. त्यामुळे जो खर्च तुम्ही सीएनजी किटसाठी केला आहे तो तुमच्या दिवसाच्या प्रवासानुसार दीड ते दोन वर्षांत वसूल होतो. जर तुमचा दिवसाला ४० किमीहून अधिक प्रवास होत नसेल तर तुम्हाला गाडीत सीएनजी बसवण्याची आवश्यकता नाही.

स्थानिक गॅरेजमध्ये सीएनजी किट स्वस्तात बसवून मिळतात. पण असे केल्याने तुमच्या गाडीची वॉरंटी रद्द होते. एआयआर मान्यताप्राप्त सीएनजी किट अधिकृत विक्रेत्यांकडूनच घ्या. आरटीओच्या कागदपत्रांवर याचा उल्लेख असू द्या. मोटार विम्याच्या कागदपत्रावर देखील सीएनजी किट बसवल्याचा उल्लेख करा.

इंधनाची बचत करताना तुम्हाला काही ठिकाणी तडजोडदेखील करावी लागते. सीएनजी बसविल्यानंतर काही समस्यांचा सामनादेखील तुम्हाला करावा लागतो. पेट्रोल कारच्या तुलनेने सीएनजी किट लावलेल्या गाडीचा परफॉर्मन्स तेवढा दमदार नसतो. पिकअप घेताना गाडी कुठेतरी कमी पडत असल्याचे तुम्हाला जाणवेल. परंतु जसे जसे इंजिन गरम होते तसे गाडीचे इंजिन अधिक सुरळीत काम करू लागते. सीएनजी किटमुळे गाडीच्या टॉप स्पीडमध्ये आणि वेग पकडण्यामध्ये देखील काही अंशी कमतरता जाणवू शकते. यावर तोडगा म्हणजे गाडी नियमित सव्‍‌र्हिसिंग द्या. यामुळे गाडीच्या सीएनजी किटमध्ये कोणताही मोठा बिघाड उद्भवणार नाही.

सीएनजी गाडय़ांनी पेट घेतल्याची अनेक प्रकरणेदेखील समोर आली आहेत. मात्र यातील बहुतांश प्रकरणात घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून केला जात होता. अशा प्रकारे गाडीचे इंधन म्हणून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणे बेकायदा आहे. लांबच्या प्रवासाला जाताना सीएनजी टाकी पूर्ण भरूनच निघा. कारण महामार्गावरील प्रत्येक पेट्रोल पंपवर सीएनजी भरण्याची सुविधा असेलच असे नाही त्यामुळे इंधन कमी न पडू देण्यासाठी आधीच काळजी घेणे योग्य.

काय करावे?

* सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांनी सरकारने दिलेल्या मोटार वाहन नियमांमध्ये दिलेल्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे.

*  गाडीच्या बनावटीसाठी अनुरूप असलेलाच सीएनजी किट आणि सिलेंडर लावा.

*  सीएनजी किट बसवण्याआधी गाडीची पूर्व रूपांतर तपासणी पूर्णपणे करून घ्या.

*  गॅस प्रणालीतून गॅस गळती होणार नाही याची खात्री करून घ्या.

*  वर्षांतून एकदा सीएनजी प्रणालीची तपासणी करून घ्या.

*  सीएनजी किट हा मान्यताप्राप्त वर्कशॉपकडूनच लावून घ्या.

काय करू नये?

*  सीएनजी किटचे भाग वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून घेऊ  नका. स्वत:हून सीएनजी किट बसवण्याचा प्रयत्न करू नका.

*  अनधिकृत वर्कशॉपमधून सीएनजी किट कोणतेही बदल किंवा सुधारणा करू नका.

*  सीएनजी टॅन्कमध्ये एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) गॅस भरू नका.

*  गाडीत गॅस भरताना गाडीत बसू नका.

*  गॅस गळती होत असल्याची कोणतीही चिन्हे आढळ्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्या.