वैद्य अश्विन सावंत

शरीराला आवश्यक खनिजे, जीवनसत्त्वे आणि जैवरसीय तत्त्वे यांचा एकत्रितरीत्या समावेश असणारे आणि सहज उपलब्ध असणारे खाद्य म्हणजे फळे. फळांचे आरोग्यामधील महत्त्व गणेशोत्सवासारख्या पारंपरिक सणांमधूनही अधोरेखित केले आहे. म्हणूनच मग गणेशपूजनासाठी केळी, चिबूड, पपनस, काकडी, नारळ, पेरू, डाळिंब आणि चिकू ही फळे अर्पण करून त्यांचा प्रसाद करून खाल्ला जातो. श्रावण-भाद्रपदमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या या फळांचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, ते समजून घेऊ या.

केळे

घराच्या परसात ज्याची झाडे विनासायास उगवतात ते म्हणजे केळे. केळामध्ये कबरेदके (२७.२ ग्रॅम), ऊर्जा (११६ ग्रॅम), कॅल्शियम (१७ गॅ्रम) आणि फॉस्फरस (३६ गॅ्रम) मुबलक प्रमाणात आहेत. तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध असल्याने गरिबांच्या पोषणासाठीचे फळ म्हणूनही केळाचा उल्लेख केला जातो. केळामध्ये पोटॅशियम (८८ गॅ्रम) अधिक प्रमाणात असल्याने रक्तदाब नियंत्रणासाठी याचा फायदा होतो. केळी खाल्ल्यानंतर तुमच्या मनाला शांत वाटत असेल तर शास्त्रीयदृष्टय़ादेखील योग्य आहे. मनाला आनंद आणि स्थिर ठेवणाऱ्या सिरोटोनिनच्या स्रवणास मदत करणारे ट्रिप्टोफेन हे प्रथिन- आम्ल केळामधून ७० मिलिग्रॅम इतके मिळते. ज्या वर्षां ऋतूमध्ये गणेशोत्सव येतो, त्या ऋतूमध्ये उद्भवणारा वातप्रकोप आणि पित्त संचय या विकृतींवर केळं हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे. या दिवसांमध्ये वातप्रकोपामुळे शरीरामध्ये वाढणारा कोरडेपणा कमी करण्यास केळाचा स्निग्ध गुण उपयोगी पडतो. मात्र केळे हे कफकारक असल्याने केळे खाल्ल्याने सर्दी आणि पडसे यांचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना मात्र अतिप्रमाणात केळी खाऊ नयेत, तसेच स्थूल व्यक्तींनीही प्रमाणामध्ये केळी खावीत. विशेषत: पोटाचा घेर किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी जेवणानंतर लगेचच केळं खाऊ नये.

पपनस

पपनस हे फळ नवीन पिढीसाठी तसे अनोळखी आहे. आंबटगोड चवीचे पपनस अग्निवर्धक असून तोंडाला रुची आणणारे व पाचक गुणांचे आहे. केळाप्रमाणेच पपनसमधून कॅल्शियम व फॉस्फरस मिळते. त्यामुळे हाडाच्या तक्रारी असणाऱ्या व्यक्तींनी हे फळ आवर्जून खावे. डोळ्यांसाठी आवश्यकबीटा-कॅरोटिन हे जीवनसत्त्व पपनसामधून मिळते. ‘बी १’, ‘बी २’ व ‘बी ३’ ही जीवनसत्त्वेही अल्प प्रमाणात यामधून शरीराला प्राप्त होतात. शरीरामध्ये थंडावा वाढवणारे पपनस पौष्टिकसुद्धा असते. पपनसाच्या फळाच्या सालीमधून तेलदेखील काढता येते.

चिबूड

चिबूडला हल्ली फळांमध्ये विशेष स्थान दिले जात नाही; परंतु सफरचंद किंवा ड्रॅगन फ्रुटच्या तुलनेत सुमारे पाचपट पोटॅशिअम चिबूडमधून मिळते. स्नायूंचे आकुंचन प्रसरण, गुणसूत्रे व प्रथिनेनिर्मिती, हृदयाचे पंपिंग आदी कार्य करण्यासाठी शरीराला दिवसभरात १५०० ते २००० मिलिगॅ्रम पोटॅशिअमची आवश्यकता असते. चिबुडाच्या १०० ग्रॅम वजनाच्या एका फोडीमध्ये सुमारे ३४० मिलिग्रॅम पोटॅशियम असते. म्हणजेच चिबुडाच्या चार मोठय़ा फोडी खाल्ल्या तर शरीराची पोटॅशियमची गरज जवळपास पूर्ण होते आणि हृदयही निरोगी राहण्यास मदत होते.

जेव्हा आपण पोटॅशियमचे सेवन करतो, तेव्हा शरीरामधील सोडियम कमी होते. उष्ण हवामानात आणि कष्टाची कामे करणाऱ्यांमध्ये सोडिअमची आवश्यकता असते. चिबूडच्या बाबतीत मात्र असे होत नाही. चिबूड खाल्ल्यानंतर सुमारे  १०० मिलिगॅ्रम पोटॅशियम शरीराला प्राप्त होत असेल, तर त्याच वेळेस सुमारे १०५ मिलिग्रॅम सोडियमदेखील मिळते. त्यामुळे पोटॅशियम आणि सोडियमची गरज भागविणारे हे फळ दोन्ही खनिजांचा शरीरामध्ये योग्य समतोल साधते.

काकडी

गणेशोत्सवामध्ये प्रसाद म्हणून दिला जाणाऱ्या फळांमध्ये अजून एक फळ म्हणजे काकडी. कोकणात थोडय़ा मोठय़ा आकाराची काकडी असते, जिला तवसं म्हणतात. काकडीमधील पाण्याचे प्रमाण इतर फळांच्या तुलनेमध्ये अधिक म्हणजे ९६ टक्के आहे. शरीरामध्ये कमी झालेले पाणी भरून काढण्यास काकडी उपयुक्त आहे. गणपतीच्या मिरवणुकीनंतर किंवा आरतीनंतर काकडीचा प्रसाद देण्यामागे हाच हेतू असावा. काकडी शरीरात थंडावा वाढवते व पित्तशामक आहे.

नारळ

कोकणात घराघरांमध्ये नारळ असल्यामुळे या दिवसांमध्ये गणपतीच्या पूजेमध्ये आणि प्रसादामध्येही पहिला मान मिळतो तो नारळाला. नारळ वात व पित्तशामक आहे. शरीरामधील कोरडेपणा कमी करणारा स्निग्ध गुण नारळामध्ये असून शिवाय तो पौष्टिक व बलवर्धकदेखील आहे. नारळामुळे शरीरातील चरबी वाढते आदी गैरसमजुती असून त्यामुळे आपल्याकडे अनेक जणांनी नारळाकडे पाठच फिरवली आहे. प्रत्यक्षात नारळामधील खोबरे (संपृक्त चरबी) खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या चिंचोळ्या होतात वा नाही हे अजूनही सिद्ध झालेले नाही. याउलट संपृक्त चरबीचे सेवन पूर्णपणे थांबवल्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्मृतिभ्रंश, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड आदी दुष्परिणाम संभवण्याची शक्यता आहे. नारळाचे नियंत्रित सेवन हे शरीरासाठी फायदेशीरच आहे. तेव्हा चरबी वाढण्याची भीती न बाळगता नारळाचे सेवन करा. मात्र जितके मोदक खाणार तितकेच परिश्रम करायला विसरू नका.

पेरू

गाव आणि शहरांमध्ये सहज उपलब्ध असणारे फळ म्हणजे पेरू. चवीला गोड आणि शरीरातला थंडावा वाढवणारा पेरूसुद्धा वात व पित्तशामक आहे. सर्दी, पडसे आणि दम्याचा त्रास असणाऱ्यांना मात्र पेरूच्या सेवनाने काही वेळेस त्रास होण्याची शक्यता आहे. पेरू शरीराला बाधत नसेल तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पेरू एक उत्तम फळ आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी, कर्करोगासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी, शरीरामधील मुक्त कणांना (फ्री-रॅडिकल्सना) कमी करणाऱ्यांसाठी आवश्यक असे ‘क’ जीवनसत्त्व पेरूमधून मिळते. संत्रे (३० मिलिगॅ्रम), सफरचंद (१ मिलिग्रॅम) यांच्या तुलनेत पेरूमधून तब्बल २१२ मिलिगॅ्रम इतक्या मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व प्राप्त होते. मॅग्नेशियम या खनिजाची कमी भरून काढण्यासाठीही पेरू उपयुक्त आहे. तेव्हा निरोगी आयुष्यासाठी नित्यनेमाने पेरू खाणे आवश्यक आहे.

डाळिंब

अवीट आंबटगोड चवीच्या डाळिंबाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे आंबट असूनही ते सर्वोत्तम पित्तशामक आहे. भाद्रपद महिन्यांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन उन्हे पडायला लागले की अनेकांना पित्ताचे विविध आजार त्रास देऊ  लागतात. या आजारांवर सहज उपलब्ध औषध म्हणजे डाळिंब. शरीरामध्ये स्निग्धता वाढवणारे, भूक व पचनासाठी मदत करणारे डाळिंब त्याच्या या गुणांमुळेच विशेष प्रसिद्ध आहे. डाळिंबातून रोगप्रतिकारशक्ती आणि प्रजननशक्तीस आवश्यक असे जस्त (झिंक) ०.८२ मिलिगॅ्रम, तर रक्तवर्धक लोह १.७९ मिलिगॅ्रम इतके मिळते.

चिकू

गोड चवीचा चिकू पित्तशामक आहे. चिकूमधून ऊर्जादायी नैसर्गिक कबरेदके २१.४ इतक्या प्रमाणात मिळतात. चिकूमध्ये आरोग्याला आवश्यक खनिजांमधील पोटॅशियम २६९ मिलिगॅ्रम, तर मॅन्गनीज ०.६८ मिलिग्रॅम इतक्या प्रमाणात असते. याशिवाय रक्तवर्धक लोह (१.२५ मिलिग्रॅम), आरोग्यास उपकारक वनस्पतीज चरबी १.१ आणि बीटा कॅरोटिन व ‘बी१’, ‘बी२’, ‘बी३’ व ‘क’ ही जीवनसत्त्वे अत्यल्प प्रमाणात मिळतात.

हिरवट पिवळा पपनस, लालचुटूक डाळिंब, हिरवीगार काकडी, केशरी-गुलाबी चिबूड, गडद हिरवी केळी, हिरवट-पिवळा पेरू, तपकिरी चिकू आणि हिरवा नारळ देवासमोर ठेवल्यानंतर आकर्षक रंगसंगती तर तयार होतेच शिवाय यांचा प्रसादही आरोग्याला पोषक असा होतो. परंतु हल्ली सफरचंद, किवी किंवा ड्रॅगन फ्रुट या फळांचे आकर्षण जास्त असल्याने हीच फळे अधिक प्रमाणात गणेशपूजनासाठी ठेवली जातात. ही फळे आरोग्यासाठी अनुकूल नसून यांमधून मिळणारी पोषणतत्त्वे ही तुलनेने फार कमी प्रमाणात असतात. तेव्हा पारंपरिक पद्धतीनुसार वरती नमूद केलेलीच फळे देवाला अर्पण करून त्यांचा प्रसाद खाण्याची आरोग्यदायी परंपरा पुढेही सुरू राहील याची काळजी घ्या.

drashwinsawant@gmail.com